जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदारांची थकीत बिले आणि इतर मागण्यांसाठी जळगाव जिल्हा जलजीवन पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या वतीने मंगळवारी, १६ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कंत्राटदार सहभागी झाले होते. अनेक वर्षांपासून थकीत असलेली बिले त्वरित मिळावीत, अवाजवी लावलेला दंड परत करावा आणि इसारा रक्कम व बिलातून कपात केलेली रक्कम परत करावी, अशा प्रमुख मागण्या कंत्राटदारांनी यावेळी केल्या.

शासनाच्या धोरणांवर तीव्र नाराजी
राज्याच्या आर्थिक बजेटचा विचार न करता शासनाच्या विविध विभागांनी हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांच्या निविदा काढल्या, मात्र त्यांची बिले देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे. या परिस्थितीमुळे कंत्राटदार मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाले असून, याच आर्थिक विवंचनेतून आतापर्यंत दोन कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. सरकारच्या या असंवेदनशील भूमिकेमुळे कंत्राटदारांमध्ये तीव्र संताप आहे.

गंभीर आंदोलनाचा इशारा
आंदोलनादरम्यान, शासनाने थकीत बिलांसाठी भरीव आर्थिक तरतूद न केल्याबद्दल कंत्राटदारांनी जाहीर निषेध केला. जर त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. कंत्राटदारांच्या या आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणेत काही प्रमाणात खळबळ उडाली असून, या प्रश्नावर सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



