२५ वर्षांपासून प्रलंबित डांगपुरा परिसरातील पाण्याचा प्रश्न अखेर सुटला 

0
134

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  यावल शहरातील डांगपुरा परिसरातील अल्पसंख्यांक नागरिकांसाठी गेली २५ वर्षे जणू दैनंदिन संघर्षाचा एक भाग ठरलेली पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर मार्गी लागली आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी माजी नगरसेवक उमेश फेगडे यांनी पुढाकार घेत आमदार अमोल जावळे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ उपाययोजना राबवण्यात आल्या. परिणामी, डांगपुरा परिसरातील नागरिकांना अखेर शुद्ध व नियमित पिण्याचे पाणी मिळू लागले आहे.

डांगपुरा हा यावल नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील एक घनदाट वस्ती असलेला अल्पसंख्यांक बहुल भाग आहे. येथील नागरिक पावसाळा असो किंवा उन्हाळा – वर्षानुवर्षे पाण्यासाठी संघर्ष करत होते. अनेक वेळा निवेदनं दिली गेली, तक्रारी नोंदवण्यात आल्या, पण या समस्येकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. परिणामी, येथील सामाजिक कार्यकर्ते इमरान पहेलवान यांच्यासह परिसरातील तरुणांनी माजी नगरसेवक उमेश फेगडे यांची भेट घेतली आणि आपली व्यथा सांगितली.

या समस्येची गांभीर्याने दखल घेत फेगडे यांनी आमदार अमोल जावळे यांच्याशी थेट संपर्क साधला. आमदार जावळे यांनी प्रशासनाशी चर्चा करून जलवाहिनीच्या कामास तातडीने मंजुरी देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर नगर परिषद प्रशासनाने जलवाहिनीचे काम वेगाने सुरू करून काही दिवसांतच पूर्ण केले. आज डांगपुरा परिसरातील घरोघरी नळाने पाणी पोहोचत असल्याने नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

या यशस्वी प्रयत्नांमुळे इमरान पहेलवान, झाकीर खान, आसीफ खान, मंजूर खान, शकील खान, अल्ताफ शेख, उमर कच्छी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आमदार अमोल जावळे व उमेश फेगडे यांचे मनःपूर्वक आभार मानले व त्यांचे फेटा बांधून स्वागत केले. या उपक्रमामुळे लोकप्रतिनिधींविषयीचा विश्वास अधिक बळकट झाला असून, प्रशासन आणि जनतेतील संवादाचा पुल अधिक मजबूत झाला आहे.

२५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाण्याच्या समस्येची अखेर सकारात्मक सोडवणूक झाल्यामुळे डांगपुरा परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.