Home Cities अमळनेर कळमसरे, वासरे येथील पूरग्रस्तांना दिलासा – शेल्टर कम हायजीन किट्सचे वाटप

कळमसरे, वासरे येथील पूरग्रस्तांना दिलासा – शेल्टर कम हायजीन किट्सचे वाटप

0
189

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  अतिवृष्टीमुळे पुराच्या झळा बसलेल्या कळमसरे व वासरे येथील पूरग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी कार्ड जालना आणि साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शेल्टर कम हायजीन किट्सचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे पुराच्या तडाख्याने उध्वस्त झालेल्या अनेक कुटुंबांना सावरण्यासाठी मोठा आधार मिळाला आहे.

मागील आठवड्यात अमळनेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. विशेषतः कळमसरे व वासरे गावातील आदिवासी वस्तीमध्ये पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले. घरांची पडझड, अन्नधान्य आणि जीवनोपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याने अनेकांना शाळा किंवा इतर ठिकाणी निवारा घ्यावा लागला. यावेळी प्रशासनाने पंचनामे केले असले तरी तातडीच्या मदतीची गरज होती.

ही गरज ओळखून ‘सेंटर फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (CARD), जालना’ आणि ‘साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर’ यांनी पुढाकार घेत पूरग्रस्तांसाठी शेल्टर कम हायजीन किट्स वाटप करण्याचा निर्णय घेतला. या किटमध्ये लहान व मोठी ताडपत्री, मच्छरदाणी, अंगधोबीचा साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, बॅग, दोरी अशा दैनंदिन गरजेच्या १० वस्तूंचा समावेश करण्यात आला होता. या वस्तूंमुळे पुरानंतरच्या संकटात सापडलेल्या कुटुंबांना स्वच्छता आणि निवाऱ्याची सुसज्ज सुविधा मिळाली.

वाटपप्रसंगी साने गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कळमसरे येथील उपसरपंच जितेंद्र राजपूत, तलाठी भूषण पाटील, पत्रकार गजानन पाटील, भागवत कोळी, संजय ठाकरे, मुकेश देसले, वासरे येथील रोहिदास पाटील, दिनेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमासाठी साने गुरुजी फाउंडेशनचे कार्यकर्ते शरद पाटील, संदीप धाकड, सचिन मोरे यांनी परिश्रम घेतले.

पूरग्रस्त परिस्थितीत केवळ शासकीय मदतीवर न राहता सामाजिक संस्थांनीही पुढे येऊन दिलासा दिल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. समाजातील संवेदनशील संस्था आणि कार्यकर्ते आपत्तीच्या काळात पुढाकार घेतल्यास प्रशासनालाही हातभार लागू शकतो, याचे उत्तम उदाहरण या उपक्रमाने घालून दिले आहे.


Protected Content

Play sound