Home राजकीय रावेर बाजार समितीत ‘ऑपरेशन लोटस’ची जोरदार चर्चा 

रावेर बाजार समितीत ‘ऑपरेशन लोटस’ची जोरदार चर्चा 

0
166


रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी कृषी उत्पन्न बाजार समितीत “ऑपरेशन लोटस” सक्रिय झाले असून, त्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. सहलीवर गेलेल्या सर्व संचालकांची जबाबदारी भाजपच्या एका नेत्यावर सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या “ऑपरेशन लोटस”ची चर्चा आज दिवसभर रावेर तालुक्यात जोरदार रंगली. बाजार समितीच्या आवारात दिवसभर राजकीय वातावरण तापलेले होते.

माजी आमदार अरुण पाटील भाजपात प्रवेश केल्यानंतर रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा राजकीय भूकंप झाल्याचे चित्र आहे. सभापती सचिन पाटील आणि उपसभापती योगेश पाटील मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करत, ठरल्याप्रमाणे वागत नसल्यामुळे तब्बल बारा संचालकांनी बंड पुकारले आहे. याच कारणावरून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे दोघांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला असून त्यामुळे बाजार समितीत राजकीय खळबळ उडाली आहे.

सन २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी आमदार अरुण पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने १३ जागा जिंकून बहुमत मिळवले होते. तर भाजप पुरस्कृत लोकमान्य शेतकरी पॅनलला ३ जागा मिळाल्या होत्या. शिवाय दोन अपक्ष संचालक निवडून आले होते. त्यामुळे बाजार समितीवर शेतकरी विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व होते. परंतु अवघ्या अडीच वर्षांत परिस्थिती अशी बदलली की सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील यांच्यावर सत्ताधारी संचालकांच्याच गटाने अविश्वास दाखल करण्याची वेळ आली.

जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी करणाऱ्यांत भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व संचालक प्रल्हाद पाटील, नुकतेच भाजपात दाखल झालेले मंदार पाटील, पंकज पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, सिकंदर तडवी, गणेश महाजन, पितांबर पाटील, पांडुरंग पाटील, विलास चौधरी, रोहित अग्रवाल, सौ. मनिषा सोपान पाटील व सौ. सविता दिनेश पाटील यांचा समावेश आहे. तर सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील यांच्या पाठीशी योगराज पाटील व शेख अजगर उभे आहेत. संचालक राजेंद्र चौधरी विदेशात असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तर संचालक जयेश कुईटे यांनी आपण सध्या तटस्थ असल्याचे स्पष्ट केले.

यामुळे महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलला सुरुंग लागला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सभापती व उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव पारित करण्यासाठी १२ संचालकांची गरज आहे. सध्या १२ पेक्षा जास्त संचालक भाजप नेत्यांच्या पाठीशी असल्याने “ऑपरेशन लोटस” सक्रिय मोडमध्ये गेले असून, कोणत्याही क्षणी रावेर बाजार समितीवर सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील आज दिवसभर बाजार समितीत हजर होते. राजकारणात सचिन पाटील नवखे असल्याने सर्व राजकीय सूत्रे रमेश पाटील यांनी स्वतःकडे घेतल्याचे सांगितले जाते. बाहेर गेलेल्या संचालकांपैकी किती जणांना रमेश पाटील आपल्या बाजूला खेचतात, यावरच सभापती सचिन पाटील यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.


Protected Content

Play sound