
अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे अमळनेर येथे महाविकास आघाडीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभात राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना (उबाठा) व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेत, एकतेचे दर्शन घडवत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने एकजूट दाखवावी, असे ठाम मत आमदार शिंदे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये पक्षीय मतभेद बाजूला ठेवून महाविकास आघाडीने एकत्र राहणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड स्थानिक पातळीवर होणार असून, स्थानिक नेतृत्वाने दिलेले निर्णयच आम्ही मान्य करू, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे आणि संघटनशक्ती वाढवणारे हे वक्तव्य टाळ्यांच्या गजरात स्वागतले गेले.
या कार्यक्रमाला जिल्ह्याचे निरीक्षक भास्करराव काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, महानगराध्यक्ष इजाज भाई मलिक, युवक जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील, तालुक्याचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत निकम यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष डी. एम. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अशोक पवार यांनी तर आभार प्रदर्शन जाकीर शेख यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



