Home Cities जळगाव केळी पिकाला हमीभाव द्यावा ; मनसे शेतकरी सेनेची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी

केळी पिकाला हमीभाव द्यावा ; मनसे शेतकरी सेनेची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी

0
231

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून केळीच्या दरात आलेल्या तीव्र घसरणीमुळे उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या केळी पिकाला हमीभाव द्यावा, व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे आणि योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जळगाव जिल्हा हा केळी पिकासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. मात्र, सध्याच्या घडीला केळीच्या दरात मोठी घसरण झाली असून प्रती क्विंटल केवळ ४०० ते ५०० रुपये दर मिळत आहे. यामध्ये मजुरी आणि वाहतूक खर्च वगळता शेतकऱ्यांच्या हातात प्रती क्विंटल फक्त ३०० ते ४०० रुपयेच उरतात. केळी पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च प्रचंड असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना या दरात कोणताही नफा मिळत नाही.

या परिस्थितीत शेतकऱ्यांचे संसार चालवणे, मुलांचे शिक्षण, विवाह आदी गोष्टी करणे कठीण बनले आहे. यावर्षी मे व जून महिन्यांत वादळी वाऱ्यामुळे केवळ केळीच नव्हे तर इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, अद्याप कोणतीही नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

या पार्श्वभूमीवर मनसे शेतकरी सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत —
१. सर्व केळी व्यापाऱ्यांची बैठक बोलावून दरात स्थिरता आणण्यासाठी उपाययोजना करावी., २. केळी पिकाला हमीभाव तातडीने जाहीर करावा.
३. सर्व व्यापाऱ्यांची नोंदणी बंधनकारक करावी. ४. केळीसाठी प्रक्रिया उद्योग आणि साठवणूक सुविधा उपलब्ध करून द्यावी. ५. पीक विमा प्रक्रिया सुलभ व शेतकरीहिताची करावी.

शेतकऱ्यांच्या या मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात, अन्यथा पुढील काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

या निवेदनावर मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील (शेतकरी सेना), तालुका अध्यक्ष अशोक पाटील (जामनेर), श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा (उपमहानगराध्यक्ष), प्रदीप पाटील (ता. अध्यक्ष), रज्जाक सय्यद, विलास सोनार (तालुका संघटक), भूषण ठाकूर, दीपक राठोड, अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Protected Content

Play sound