Home धर्म-समाज हैद्राबाद गॅझेटवरील शासन निर्णय विरोधात यावल येथे निषेध मोर्चा

हैद्राबाद गॅझेटवरील शासन निर्णय विरोधात यावल येथे निषेध मोर्चा

0
77

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हैद्राबाद गॅझेटवरील शासन निर्णयाच्या विरोधात ओबीसी समाजाकडून यावल येथे जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला. ओबीसी आरक्षणात घुसखोरी केल्याचा आरोप करत सकल ओबीसी समाजाच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. ‘आमच्या ताटातील आरक्षणावर डोळा ठेवू नका’ अशा जोरदार घोषणांनी यावल शहर दणाणून गेले.

२ सप्टेंबर रोजी राज्य शासनाने मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटच्या आधारे ‘मराठा कुणबी / कुणबी मराठा’ हे एकच असल्याचा अध्यादेश जारी केला होता. या निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गावर अन्याय झाला असून, मराठा समाजाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणात बेकायदेशीर घुसखोरी होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे हा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली.

यावलच्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यावल विभागाच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चात विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तालुका अध्यक्ष नितिन सोनार, माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, माजी नगरसेवक उमेश फेगडे, चेतन आढळकर यांची या मोर्चात प्रमुख उपस्थिती होती.

शनी मंदिर परिसरातून सुरु झालेला मोर्चा मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करत तहसील कार्यालयात पोहोचला. याठिकाणी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात न्यायमूर्ती शिंदे समिती पक्षपाती असल्याचा आरोप करत ती तात्काळ बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच ५३ लाख बोगस कुणबी नोंदी रद्द करण्याचीही आग्रही मागणी करण्यात आली.

निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला की, जर शासनाने या मागण्या मान्य केल्या नाहीत तर संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील.


Protected Content

Play sound