Home Cities अमळनेर करणखेडा येथे ‘मिल के चलो असोसिएशन’चा अभिनव उपक्रम उत्साहात

करणखेडा येथे ‘मिल के चलो असोसिएशन’चा अभिनव उपक्रम उत्साहात

0
94

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  ‘मिल के चलो असोसिएशन, अमळनेर’ या सामाजिक संस्थेचा सहावा वर्धापन दिन करणखेडा येथील विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागवण्यासाठी घेतलेल्या प्रात्यक्षिक सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नंदकिशोर शंकरराव पवार यांनी भूषवले. कार्यक्रमाची सुरुवात ‘मिल के चलो असोसिएशन’च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रमुख मार्गदर्शक श्री. विवेक सूर्यवंशी सर आणि श्री. चेतन वैराळे सर यांच्या सत्काराने झाली. यानंतर कार्यक्रमास शैक्षणिक व वैज्ञानिक रंग चढवण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. ए. बी. धनगर सर यांनी संस्थेच्या उद्दिष्टांविषयी व कार्यक्रमाच्या हेतूबाबत थोडक्यात माहिती दिली. विद्यार्थ्यांचे मन एकाग्र करण्यासाठी एक हलकी-फुलकी सक्रियता घेण्यात आली, ज्यामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांनी आनंदाने भाग घेतला. त्यानंतर प्रयोग सत्राला सुरुवात झाली.

या प्रयोग सत्रात विद्यार्थ्यांना थेट प्रयोग दाखवण्याऐवजी, प्रयोगांमागील तत्त्वे आणि कारणे शोधण्याचे आव्हान देण्यात आले. त्यामुळे त्यांची विचारशक्ती आणि वैज्ञानिक जिज्ञासा अधिकच वाढीस लागली. प्रयोग संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यावरील अभिप्राय दिला. काही विद्यार्थ्यांनी तर स्वतः प्रयोग करून त्यामागील कारणेही समजावून सांगितली. हे पाहून उपस्थित शिक्षकसुद्धा प्रभावित झाले आणि प्रयोगांमागील कारणे समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

५ वी ते १० वी पर्यंतच्या जवळपास १९७ विद्यार्थ्यांनी या सत्रात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी या सत्रातून बरेच काही शिकल्याचे नमूद केले असून, अशा प्रकारचे सत्र अधिक वेळा आयोजित व्हावीत, अशी इच्छा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. बी. धनगर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आणि त्यांनी परिश्रमपूर्वक सहकार्य केले.


Protected Content

Play sound