Home धर्म-समाज वनोली येथील साई मंदिरात भक्तनिवासाचे काम अपूर्ण, ग्रामस्थांमध्ये नाराजी

वनोली येथील साई मंदिरात भक्तनिवासाचे काम अपूर्ण, ग्रामस्थांमध्ये नाराजी

0
156


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील वनोली येथील श्री क्षेत्र साईबाबा देवस्थानच्या भक्तनिवासाचे काम दीड वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नवरात्रीचा उत्सव तोंडावर आला असताना, हे भक्तनिवास भाविकांच्या सोयीसाठी उपलब्ध होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कामाच्या दिरंगाईमुळे, ट्रस्टचे अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश सदस्य हिरालाल चौधरी यांनी नवरात्रीपूर्वी काम पूर्ण न झाल्यास चौकशी लावण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.

राजकीय श्रेयवादाच्या वादात काम रखडले
गेल्या वर्षी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने व हिरालाल चौधरी यांच्या पाठपुराव्यामुळे वनोली येथील साईबाबा देवस्थानसाठी २५ लाख रुपयांचे भक्तनिवास मंजूर करण्यात आले होते. हे काम तत्कालीन आ. शिरीष चौधरी यांच्या पत्रावरून एका मजूर सोसायटीला देण्यात आले. काम कोणालाही मिळो, ते वेळेत आणि चांगल्या दर्जाचे व्हावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा असते. मात्र दीड वर्ष उलटूनही हे काम अपूर्ण आहे. ठेकेदार आणि संबंधित अधिकारी फोन उचलत नसल्याचा आरोपही ग्रामस्थ करत आहेत.

भक्तांची गैरसोय; निकृष्ट कामाचा आरोप
नवरात्रीदरम्यान वनोली येथे मोठा यात्रोत्सव भरतो, ज्यात मुंबई, पुणे, गुजरात, मध्य प्रदेशातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अष्टमीच्या दिवशी सुमारे ५० हजार भाविक महाप्रसादासाठी उपस्थित असतात. गाव लहान असल्याने, या भाविकांच्या राहण्याची गैरसोय होते. या भक्तनिवासाचा उपयोग यात्रेकरूंना निवारा म्हणून व्हावा अशी अपेक्षा होती. मात्र, सध्या भक्तनिवासाचे काम निकृष्ट दर्जाचे दिसत आहे. खिडक्या, दरवाजे निकामी असून, गच्चीचे फिनिशिंग आणि फरशीचे काम बाकी आहे. या ठेकेदाराला बिल अदा केले आहे का, याचीही माहिती नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ठेकेदाराचे पैसे मंजूर करू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून, हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.


Protected Content

Play sound