पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई करत अंमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली आहे. एका राजस्थानी ढाब्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल १६४ किलो ६८४ ग्रॅम वजनाचे अफूचे सुकलेले बोंडे) जप्त केले आहेत. या कारवाईत अंमली पदार्थांसह एक ट्रक, एक हॅरियर कार आणि रोख रक्कम असा एकूण ५० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राजस्थानी ढाब्यावर पोलिसांचा छापा
सोमवारी ८ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ‘श्री रामदेव राजस्थानी ढाबा’ येथे काही इसम अंमली पदार्थांची देवाणघेवाण करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून पोलीस निरीक्षक अशोक पवार आणि सहायक पोलीस निरीक्षक योगेश महाजन आणि यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाडसी छापा टाकला. या छाप्यात एका आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले, तर त्याचे तीन ते चार साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. या पळून गेलेल्या आरोपींनी आपली दोन वाहने सोडून पळ काढला, त्यापैकी एक हॅरियर कार पोलिसांनी नंतर जप्त केली.

जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपी शैतानाराम मानाराम विश्नोई (वय ३४, रा. राजस्थान) याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला: यात १३ लाख १७ हजार रूपये किंमतीचा १६४ किलो ६८४ ग्रॅम वजाचा अफूचे बोंडे, २० लाख रूपये किंमतीची टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक (RJ-१९-CG-२१११), १० हजाराचा वजन काटा, २ लाख ५५ हजार ४७० रूपये रोख, १५ लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची कार असा एकुण ५० लाख ८२ हजार ९४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शैतानाराम विश्नोई आणि त्याच्या फरार साथीदारांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक योगेश महाजन पुढील तपास करत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे.



