जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील लोणवाडी गावामध्ये मागील भांडणातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली आहे. रविवार ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता लोणवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या या घटनेमध्ये मिलींद हिरालाल धाडी आणि त्यांचे वडील हिरालाल धाडी यांना गंभीर मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी सोमवारी ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तीन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतात जात असताना झाला हल्ला
हाणामारीची ही घटना रविवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. फिर्यादी मिलींद हिरालाल धाडी वय २२ रा. लोणवाडी ता.जळगाव हे रविवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आपल्या शेतात जात असताना त्यांना लोणवाडी ग्रामपंचायतीसमोर तिघांनी अडवले. विक्रम साहेबराव चव्हाण, दशरथ साहेबराव चव्हाण आणि हेमराज साहेबराव चव्हाण या तिघांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून मिलींद धाडी यांना चापट्या-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मिलींद यांचे यांचे वडील हिरालाल धाडी हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले. त्यांचा राग अनावर झालेल्या संशसित आरोपी विक्रम चव्हाण याने जमिनीवर पडलेला दगड उचलून हिरालाल चव्हाण यांच्या डोक्यात मारला, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली.

गाव सोडून जाण्याची दिली धमकी
याचवेळी इतर दोन संशयित आरोपी दशरथ चव्हाण आणि हेमराज चव्हाण यांनीही दगडफेक करत पिता-पुत्रांना शिवीगाळ केली. त्यांनी ‘तुम्ही गावात राहू देणार नाही’ अशी धमकी दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या पिता-पुत्रांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . या प्रकरणाचा तपास पोउपनिरीक्षक चंद्रकांत धनके करत आहेत.



