जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कंडारी शिवारातील एका शेतामध्ये हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील नातेवाईकांकडे आलेली सावित्री गुरीलाल भिलाला (वय १६) या गतिमंद मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास समोर आली असून, या प्रकरणी नशिराबाद पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एकटेपणातून उचलले पाऊल
मूळची मध्यप्रदेशातील मलगावकोठा (ता. झिरण्या, जि. खरगोन) येथील सावित्री भिलाला कंडारी येथे राहणारे नातेवाईक रवी पावरा यांच्याकडे काही दिवसांपूर्वी आली होती. रवी पावरा हे येथील शेतकरी काशीनाथ चिंधू पाटील यांच्या शेतात मजुरीचे काम करतात आणि ते तिथेच राहतात. सोमवारी सकाळी ते शेतात कामाला गेल्यामुळे सावित्री घरी एकटीच होती. याच एकटेपणातून तिने राहत्या झोपडीत गळफास लावून घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली.

उपचाराखालील मुलीच्या आत्महत्येने नातेवाईक शोकाकुल
दुपारी काम आटोपून रवी पावरा घरी परतल्यावर त्यांना ही घटना लक्षात आली. त्यांनी तातडीने कंडारीचे पोलीस पाटील सुर्वे यांना माहिती दिली. पोलीस पाटील सुर्वे यांनी नातेवाईकांच्या मदतीने सावित्रीचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल केला. डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. सावित्री ही गतिमंद असून तिच्यावर उपचार सुरू होते, याच नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. मुलीच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले असून, या दुर्दैवी घटनेमुळे तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस पुढील तपास करत आहेत.



