Home Cities धरणगाव महात्मा फुले हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात ; विद्यार्थ्यांकडून जिजाऊंची प्रतिमा भेट 

महात्मा फुले हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात ; विद्यार्थ्यांकडून जिजाऊंची प्रतिमा भेट 

0
119

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुवर्ण महोत्सवी महात्मा फुले हायस्कूलमध्ये शिक्षक दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकदिवसीय शाळेचा संपूर्ण कारभार स्वतः सांभाळत शिक्षकांच्या भूमिकेचा अनुभव घेतला. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी शाळेला राजमाता जिजाऊंची भव्य प्रतिमा भेट देत आपल्या गुरूंप्रती आदरभाव व्यक्त केला.

शाळेचे विद्यार्थी मुख्याध्यापक वैभव माळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या गुरूंना महापुरुषांचे ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.

या कार्यक्रमात विद्यार्थिनी जया सोनवणे हिने सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर मार्मिक भाष्य करत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. विद्यार्थी शिक्षक भावना चंडाले, वर्षा गजरे, शितल भोई, प्रिया पाटील, राज पाटील, पुरुषोत्तम पाटील, सिद्धार्थ बैसाणे, उमेश महाजन आणि यश जाधव यांनी वर्ग चालविण्याचा अनुभव कथन करत या भूमिकेतून मिळालेल्या शिकवणीबद्दल मनोगत व्यक्त केले.

मुख्याध्यापक जे. एस. पवार यांनी आपल्या मार्गदर्शनात महापुरुषांच्या जीवनपटाचा मागोवा घेत त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थी मुख्याध्यापक वैभव माळी याने एका दिवसासाठी शाळा चालविण्याचा अनुभव अतिशय प्रेरणादायी ठरल्याचे सांगून मुख्याध्यापक पवार सरांचे आभार मानले. त्याने शिक्षक दिनाचे खरे महत्त्व समजावून सांगितले.

कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन शितल भोई हिने तर आभार प्रदर्शन राज पाटील याने केले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी आणि शिक्षकांमधील स्नेहबंध अधिक घट्ट झाले आणि शाळेच्या शिक्षण संस्कृतीला एक वेगळा उजाळा मिळाला.


Protected Content

Play sound