जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पंजाब राज्यातील अमृतसर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमुळे हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संकटसमयी जळगाव जिल्हा रेड क्रॉस आणि पीपल बँकेच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा ट्रक रवाना करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या हस्ते हा मदतीचा ट्रक रात्री ९ वाजता पंजाबकडे मार्गस्थ झाला.
या ट्रकमध्ये पूरग्रस्तांसाठी लागणाऱ्या अन्नधान्य सामग्रीसह स्वच्छता साधने, दैनंदिन वापरातील वस्तू, आणि तातडीच्या उपचारांसाठी आवश्यक औषधांचा समावेश करण्यात आला आहे. हा मदतीचा ट्रक दोन दिवसांच्या आत अमृतसरमध्ये पोहोचणार असून, तेथील जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने हे साहित्य गरजूंमध्ये वितरित करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी दिली.

या उपक्रमात अनेक पदाधिकारी, अधिकारी व स्वयंसेवकांनी सक्रीय सहभाग नोंदवला. रेड क्रॉस व जळगाव पीपल बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, डॉ. शशिकांत गाजरे, गनी मेमन, डॉ. प्रसन्न कुमार रोहिदासनी, डॉ. मंगलाताई ठोंबरे (चेअरमन), सुभाष सांखला (सेक्रेटरी), राजकुमार वाणी (व्हाइस चेअरमन – रेड क्रॉस रक्त केंद्र), हर्षदभाई दोशी (कार्यकारिणी सदस्य), लक्ष्मण तिवारी (प्रशासकीय अधिकारी), डॉ. राजेश सुरळकर (सह प्रशासकीय अधिकारी), सौ. उज्वला वर्मा (जनसंपर्क अधिकारी), महेश सोनगिरे (लेखापाल), संजय साळुंखे (सह लेखापाल), योगेश सपकाळे आणि मनोज वाणी (कार्यालयीन सहाय्यक), समाधान वाघ व सौ. शीतल शिंपी (सफाई कर्मचारी) आदी मान्यवर उपस्थित होते.
जळगाव रेड क्रॉसच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, इतर संस्थांनाही यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. आपत्तीच्या काळात एका राज्यातून दुसऱ्या राज्याला मदतीचा हात दिल्याने सामाजिक एकोपा व माणुसकीचे दर्शन घडल्याची भावना व्यक्त केली जात आहे.



