Home Cities जळगाव जिल्हा माहिती अधिकारीपदी डॉ.रवींद्र ठाकूर रुजू

जिल्हा माहिती अधिकारीपदी डॉ.रवींद्र ठाकूर रुजू

0
130

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार आज दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. रवींद्र ठाकूर यांनी औपचारिकपणे स्वीकारला. जिल्हा माहिती कार्यालयात पार पडलेल्या या स्वागत समारंभप्रसंगी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. ठाकूर हे प्रशासनात उत्कृष्ट अनुभव असलेले अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी राज्य शासनाच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जबाबदारी सांभाळलेली आहे.

डॉ. रवींद्र ठाकूर यांनी मंत्रालयातील सहायक संचालक, विभागीय माहिती कार्यालय नाशिक, छत्रपती संभाजीनगर तसेच पुणे व अहिल्यानगर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील त्यांचा अनुभव संपन्न असून, त्यांच्या कामाची छाप विविध स्तरांवर उमटलेली आहे. डॉ. ठाकूर हे मूळचे जळगावचेच असून, स्थानिक पातळीवरील सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासनिक प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे.

शासकीय सेवेत दाखल होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारितेतही आपला ठसा उमटवला आहे. ‘दैनिक जनशक्ती’ आणि ‘दैनिक देशदूत’ या नामवंत वृत्तपत्रांमध्ये त्यांनी पत्रकार म्हणून काम केले आहे. तसेच जळगावच्या एम. जे. महाविद्यालयात संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागात प्राध्यापक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेशी संवाद साधण्याची आणि जनतेशी प्रभावीपणे पोहोचण्याची कला त्यांना अवगत आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. ठाकूर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “जिल्हा माहिती कार्यालय हे शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. शासनाच्या धोरणांचा प्रभावी प्रचार आणि जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”


Protected Content

Play sound