यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरासह तालुक्यातील नायगाव, कोरपावली, डांभुर्णी आणि सावखेडासिम या चार गावांतील पाच दिवसीय सार्वजनिक गणेशोत्सव आज (रविवार) विसर्जन मिरवणुकीनंतर संपन्न होणार आहे. दुपारपासून सुरू होणाऱ्या मिरवणुकांसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाकडून व्यापक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यावल शहरात गेल्या अनेक वर्षांपासून पाच दिवसीय गणेशोत्सवाची परंपरा आहे. यावर्षी देखील शहरातील २१ सार्वजनिक व १ खाजगी अशा एकूण २२ गणेश मंडळांनी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती. तरुणांमध्ये उत्साह ओसंडून वाहत असून, अनेक मंडळांनी यंदा भव्य आणि उंच मूर्तींची प्रतिष्ठापना करून सजावटीला विशेष भर दिला होता. रविवारी दुपारपासून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होणार असून, रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका शांततेत पार पडतील, अशी शक्यता आहे.

गणेशोत्सव काळात शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी विशेष नियोजन केले आहे. यामुळे यावल शहरात रविवार सकाळपासून पोलीस बंदोबस्ताची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी पाच दिवसीय उत्सव साजरा होत असल्याने यावल शहरात पोलिस छावणीसारखे वातावरण निर्माण झाले आहे. अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दल, शिघ्रकृती दल आणि दंगा नियंत्रण पथक अशा एकूण ३२५ कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे.
मिरवणुकीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व शांतता समिती सदस्यांनी सहकार्याचे आवाहन केले असून, सकाळपासूनच मिरवणूक मार्गावर सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. यावल शहराव्यतिरिक्त तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव, कोरपावली, डांभुर्णी व सावखेडासिम या गावांतील गणेश विसर्जन मिरवणुकाही आज सायंकाळपर्यंत पार पडणार आहेत.



