Home प्रशासन जिल्हा परिषद गणेशोत्सवातील ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमातून सामाजिकतेचा नवा संदेश

गणेशोत्सवातील ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमातून सामाजिकतेचा नवा संदेश


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सण-उत्सव हे फक्त पूजा-अर्चा आणि पारंपरिक विधीपुरते मर्यादित न राहता त्यातून सामाजिकतेची नवी ओळख निर्माण झाली पाहिजे, असा संदेश अंतर्नाद प्रतिष्ठानच्या ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमातून दिला जात आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याच्या भावनेतून हा उपक्रम विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्यात आत्मविश्वास जागवतो, असे प्रतिपादन वाघळूद जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील यांनी केले.

सालाबादाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या निमित्ताने अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे ‘एक दुर्वा समर्पण’ हा उपक्रम राबविण्यात आला. भुसावळ तालुक्यातील फेकरी जिल्हा परिषद शाळेत पार पडलेल्या या उपक्रमात तब्बल ५७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यामध्ये बालमित्र पुस्तके, वह्या, पाटी, पेन्सिल, पेन आदींचा समावेश होता.

कार्यक्रमात सरपंच चेतना संजय भिरूड, सामाजिक कार्यकर्ते संजय भिरूड, सुनील भिरूड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रुकसाना बी. फकीर, नसीरशहा फकीर, सलमानशहा फकीर, साबीरशहा फकीर, मुख्याध्यापक चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षिका प्रियंका कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक अमितकुमार पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन केतन महाजन यांनी मानले तर सूत्रसंचालन कपिल धांडे यांनी केले.

गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून त्यातील बचतीतून हा उपक्रम राबविण्याची परंपरा अंतर्नाद प्रतिष्ठानने गेल्या आठ वर्षांपासून जपली आहे. पाच शाळांमध्ये दरवर्षी हा उपक्रम होत असून यंदा या उपक्रमाचे नववे वर्ष साजरे झाले. दात्यांच्या स्वेच्छा योगदानातून उभारलेली ही मदत थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाते.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग.स.सोसायटी सदस्य योगेश इंगळे, ज्ञानेश्वर घुले, कुंदन वायकोळे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील तसेच पालक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शाळा व्यवस्थापन समिती व स्थानिक ग्रामस्थांनी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

गणेशोत्सव साजरा करण्याची ही आगळीवेगळी पद्धत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली असून सामाजिक बांधिलकीची जाणीव समाजात रूजविण्याचा हा एक सुंदर प्रयत्न ठरला आहे.


Protected Content

Play sound