Home करियर जिल्हाधिकाऱ्यांची ‘वारसा’ छायाचित्र प्रदर्शनास भेट : छायाचित्रकारांच्या कल्पकतेचे कौतुक

जिल्हाधिकाऱ्यांची ‘वारसा’ छायाचित्र प्रदर्शनास भेट : छायाचित्रकारांच्या कल्पकतेचे कौतुक


जळगावलाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी।  शहरातील पीएनजी कलादालनात सुरू असलेल्या ‘वारसा’ या छायाचित्र प्रदर्शनाला आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली. त्यांनी प्रदर्शनातील छायाचित्रांचे बारकाईने निरीक्षण करून छायाचित्रकारांशी संवाद साधला तसेच त्यांच्या कलाकृतींचे मनापासून कौतुक केले.

या प्रदर्शनात राजकीय व सामाजिक आशयाचे उत्कृष्ट छायाचित्रांचा समावेश करण्यात आला असून, त्यातून समाजातील वास्तव परिस्थिती, जनजीवनातील संघर्ष, सांस्कृतिक वारसा तसेच लोकजीवनाचे विविध पैलू अधोरेखित झाले आहेत. छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सामाजिक बदल, लोकांच्या भावना आणि घटनांची सांगड घालत प्रभावी चित्रण केले आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या निमित्ताने सांगितले की, “छायाचित्र हे केवळ कलाकृती नसून समाजातील घटना, मूल्ये आणि वारसा जतन करणारे सशक्त माध्यम आहे. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळते.”

या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार शिवलाल बारी, छायाचित्रकार सतीश जगताप, पीएनजीचे गिरीश डेरे, राहुल खरात, सुलक्षणे तसेच ज्येष्ठ पत्रकार राजेश यावलकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही छायाचित्रकारांच्या प्रयत्नांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.

‘वारसा’ प्रदर्शनामुळे जळगावातील कलारसिकांना सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाचे विविधरंगी दर्शन घडत आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Protected Content

Play sound