मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी। चांगदेव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे माजी सरपंच सुपडू भाऊ बोदडे, जिल्हा परिषद गटाचे प्रमुख श्री कैलास भाऊ कोळी आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वानखेडे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या ऐतिहासिक घटनेला मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे कार्य सम्राट आमदार चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात शिवसेनेचे तालुकाप्रमुख नवनीत पाटील, उपजिल्हा संघटक पंकज कोळी, युवा सेना प्रमुख पंकज राणे, संतोष माळी, जे. के. चौधरी, अनिल म्हसाने, दीपक वाघ व विविध पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेच्या विचारधारेप्रति आकर्षित होऊन या नेत्यांनी आपल्या राजकीय करिअरची दिशा बदलली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना गावाच्या विकासाबद्दल चर्चा केली. त्यांनी आश्वासन दिले की, शिवसेनेच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यात येईल आणि शेतकऱ्यांचे, युवकांचे तसेच महिला सशक्तीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येतील. त्याचबरोबर त्यांनी सर्व लोकांशी संवाद साधण्याची महत्त्वाची भूमिका घेतली.

गावातील प्रमुख जेष्ठ मंडळी आणि युवक मंडळींनी आमदार पाटील यांचा उत्साहात सत्कार केला आणि त्यांचे आभार मानले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, या कार्यकर्त्यांना जिल्हाप्रमुख समाधान महाजन आणि शिवसेनेचे नेते विनोद तराळ यांच्याकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.
या प्रवेशामुळे शिवसेनेला चांगदेव परिसरात एक नविन आणि ठळक राजकीय ताकद प्राप्त झाली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये या प्रवेशाचे महत्त्व वाढल्याचे राजकीय विश्लेषक मानत आहेत.



