Home Cities रावेर वीज पडून तरुण मेंढपाळ ठार : परिसरात हळहळ

वीज पडून तरुण मेंढपाळ ठार : परिसरात हळहळ


रावेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मुंजलवाडी शिवारात काल रात्री झालेल्या विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसात एक दुर्दैवी घटना घडली. विज पडून दादा कोळपे (वय २०, रा. लालमाती पाड्या) या तरुण मेंढपाळाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे आठच्या सुमारास रावेर तालुक्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची सुरूवात झाली. याच दरम्यान दादा कोळपे हे आपल्या कुटुंबासह पाड्यावर थांबले होते. अचानक विज पडल्याने ते जागेवरच कोसळले. त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात हलविले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या घटनेनंतर कोळपे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच बाळा आमोदकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांच्या टीमने मृतकाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

सध्या परिसरात शोककळा पसरली असून पावसाळ्याच्या दिवसांत विजेच्या धोक्याबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound