जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषद जळगावने प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता या दोन्ही बाबींचा उत्तम समतोल राखत एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मार्च 2025 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केवळ पाच महिन्यांच्या अल्पावधीत 207 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून ही प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या इतिहासातील एक महत्त्वाची कामगिरी ठरली आहे.

ही पदोन्नती प्रक्रिया संपूर्णपणे समुपदेशन पद्धतीने राबविण्यात आली. प्रक्रियेदरम्यान पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी सर्व पदोन्नती संबंधित बैठकींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यामुळे कोणतीही शंका अथवा आरोप उद्भवण्याची शक्यता नाकारता येते. प्रशासनातील विविध विभागांमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांना याचा लाभ मिळाल्याने कर्मचारी वर्गात समाधान आणि प्रोत्साहनाची लाट पसरली आहे.

पदोन्नती मिळालेल्या विभागांमध्ये शिक्षण विभाग आघाडीवर असून तब्बल 93 कर्मचारी यांना पदोन्नती मिळाली आहे. त्याखालोखाल आरोग्य विभागातील 63, अर्थ विभागातील 14, बांधकाम आणि ग्रामपंचायत विभागातील प्रत्येकी 11, पशुसंवर्धन विभागातील 7, कृषी विभागातील 5, तर सामान्य प्रशासन विभागातील 3 कर्मचारी पदोन्नत झाले आहेत. संबंधित विभागांमध्ये सहाय्यक लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, आरोग्य सेवक, पशुधन पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, वरिष्ठ सहाय्यक अशा विविध पदांवर पदोन्नती देण्यात आली.
प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पदोन्नतीची प्रक्रिया अल्प कालावधीत पूर्ण झाली असून, यामध्ये समुपदेशन पद्धतीचा प्रभावी वापर करून कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यात आला. ही प्रक्रिया केवळ प्रशासनिक नसून कर्मचारी कल्याणाच्या दिशेने उचललेले दूरगामी पाऊल असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
या ऐतिहासिक प्रक्रियेमुळे जिल्हा परिषद जळगावच्या प्रशासनातील कार्यक्षमता वाढवण्यास हातभार लागला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये स्थिरता, नवा जोम आणि निष्ठा निर्माण झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे नेतृत्व प्रशासनात नवसंजीवनी ठरल्याचे प्रत्यक्ष उदाहरण या पदोन्नती प्रक्रियेमधून दिसून येते.



