जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, जळगाव यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने महासमरसतेची आरती सामाजिक सलोखा आणि समतेचा संदेश देत मोठ्या उत्साहात पार पडली. सलग १५व्या वर्षी ही परंपरा जपताना, समाजातील दुर्लक्षित घटकांना आरतीचा मान देऊन गणरायासमोर त्यांचे स्थान अधोरेखित करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या आगमन सोहळ्यात सहभागी असलेल्या मंडळांमध्ये यंदा श्री गणाधीश फाउंडेशन, नवीपेठ मित्र मंडळ, स्नेहल प्रतिष्ठान पिंप्राळ्याचा राजा आणि ओम साई नगर युवक मित्र मंडळ यांचा समावेश होता. या मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशा, वाद्य आणि आकर्षक देखाव्यांसह गणरायाचे स्वागत केले. या वेळी खास आकर्षण ठरली ती “महासमरसतेची आरती” — जिच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना श्रद्धेने सन्मानित करण्यात आले.

यंदा आरती करण्याचा मान गुलाबी रिक्षा चालक म्हणून महिलांच्या सुरक्षिततेचे प्रतिक बनलेल्या सौ. पौर्णिमा कोळी यांना देण्यात आला. त्यांच्या बरोबरच सफाई कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट, रविंद सौदे व सौ. कविता सौदे, लक्ष्मण अंभोरे, सौ. सविता झणके, शिवाजी झणके, सौ. विद्या नंनवरे आणि कुलदीप नंनवरे यांनाही आरती करण्याची संधी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
सामाजिक समतेचा हा उपक्रम केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित नसून, त्यामागे एक ठोस सामाजिक संदेश देण्याचा महामंडळाचा उद्देश आहे. समाजातील कामगार, सफाई कर्मचारी, महिला वाहनचालक यांच्यासारख्या घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्यात सहभागाची भावना निर्माण करणारी ही आरती जळगावच्या गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट्य बनली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, ज्येष्ठ पदाधिकारी किशोर भोसले, माधव कुलकर्णी, समन्वयक सूरज दायमा, शरीफ पिंजारी, छोटू अग्रवाल, मनीष झंवर, अजिंक्य देसाई, चेतन पाटील, धनंजय चौधरी, भुषण शिंपी, विनोद अनपट, सुजय चौधरी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांच्याच प्रयत्नांतून सलग १५ वर्षे सुरू असलेला हा सामाजिक समरसतेचा उपक्रम यंदाही यशस्वीपणे पार पडला.



