अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर निम रस्त्यालगत असलेल्या कळमसरे गावातील “नवसाचा गणपती” हे मंदिर स्थानिक आणि तालुक्यातील भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र बनले आहे. संकष्टी चतुर्थीला येथे होणारी दर्शनासाठीची भाविकांची गर्दी, मनोभावे नवस बोलणारे भक्त आणि नवस पूर्ण झाल्यानंतर फेडण्यासाठी येणाऱ्या लोकांनी या मंदिराची लोकप्रियता वाढवली आहे.

या मंदिराचा इतिहास १९९३ पासून सुरू होतो. नंदुरबार येथून कळमसरेला नोकरीनिमित्त आलेले वायरमन आणि सामाजिक कार्यकर्ते हरीश परशुराम मराठे यांनी या गणपती मंदिराची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा पुढाकार घेतला. त्यांनी गावकऱ्यांची संमती घेऊन, त्यांच्या मदतीने आणि विविध दानशूर व्यक्तींकडून वर्गणी गोळा करून मंदिर उभारणीस सुरुवात केली. यामध्ये गावातील तसेच बाहेरील अनेक भक्तांनीही मोलाची मदत केली. परिणामी, काही वर्षांतच सुरेख, सुंदर आणि गगनचुंबी मंदिराचे स्वप्न साकार झाले.

सात ते आठ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर २००० साली मंदिराचे काम पूर्ण झाले. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री गणेशाची आकर्षक मूर्ती विराजमान आहे. याच गाभाऱ्यात महादेवाची पिंडही स्थापित करण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसरात एक आध्यात्मिक शांतता आणि भक्तिभाव दरवळतो. विशेष म्हणजे, २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मंदिराला नव्याने रंगरंगोटी करण्यात आली असून, हे कार्य गावातील नेहमी सामाजिक धार्मिक कामात पुढे असणारे मधुकर यशवंत माळी यांनी पार पाडले आहे.
या मंदिराला “नवसाचा गणपती” असे म्हटले जाते कारण येथे नवस करणाऱ्यांचे नवस पूर्ण होतात, असा स्थानिक अनुभव आहे. या गणेश मंदिराशी कोणतीही प्राचीन आख्यायिका नसली तरी, येथे येणाऱ्या भाविकांच्या अनुभवांवरून हे मंदिर नवसाला पावणारे ठरले आहे. अनेकांनी येथे नवस केल्यावर आयुष्यात सकारात्मक बदल घडल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येथे मनोभावे नवस बोलण्याची परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने सुरू आहे.



