मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतकरी विजेअभावी अंधारात खितपत असताना, महावितरण कार्यालयात ठेकेदाराचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने काही दिवसांपूर्वी या संदर्भात बातमी प्रसिद्ध करताच संतप्त झालेल्या शिवसेनेने आज मुक्ताईनगर महावितरण कार्यालयात जोरदार आंदोलन छेडले. “दररोज शेतकऱ्यांचा वाढदिवस साजरा करू!” असा इशारा देत शिवसैनिकांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबत कार्यालयातच शेतकऱ्याचा वाढदिवस साजरा केला.
हा सगळा प्रकार महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवाजीराव चव्हाण यांच्या दालनातच घडला. शेतकरी बाहेर ताटकळत उभे, आणि आत ठेकेदाराचा वाढदिवस केक फोडून साजरा होत होता – हे दृश्य पाहून संतापाची लाट उसळली. या निषेधार्थ शिवसेनेने आज आंदोलन करून चव्हाण व संबंधित ठेकेदारावर कारवाईची जोरदार मागणी केली. “शासनाच्या कार्यालयात असा थाटामाटाचा उत्सव, तोही जनतेच्या हालांवर पांघरूण घालून – हा प्रकार सहन केला जाणार नाही,” असे ठाम मत शिवसैनिकांनी व्यक्त केले.

यावेळी तालुका प्रमुख नवनीत पाटील यांनी ठेकेदारांच्या मनमानीवर आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षावर घणाघात केला. “चव्हाण रुजू झाल्यापासून फक्त ठराविक ठेकेदारांचे आर्थिक हित पाहिले जात आहे, तर शेतकऱ्यांची कामे प्रलंबित ठेवली जात आहेत,” असा आरोप करत त्यांनी इशारा दिला की, जर संबंधितांवर कारवाई झाली नाही तर दररोज महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांचा वाढदिवस साजरा केला जाईल.
यात पुढाकार घेतलेले नगरसेवक निलेश शिरसाट यांनी “ट्री कटिंगचा कचरा कोण उचलणार?” या प्रश्नावर चव्हाण यांच्याकडून आलेल्या “ठेकेदाराची जबाबदारी आहे” या उत्तरावर नाराजी व्यक्त केली. यावर संतप्त शिवसैनिकांनी “जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणे ही सामान्यांची फसवणूक आहे” असे म्हणत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कार्यकारी अभियंता चव्हाण म्हणाले, “ठेकेदार स्वतः केक घेऊन आला, हा प्रकार चुकीचा आहे. माझी चूक मान्य करतो, शेतकऱ्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील.” मात्र शिवसेनेने ही प्रतिक्रिया केवळ गुळमुळीत सफाई असल्याची टीका केली आहे.
या आंदोलनात तालुका प्रमुख नवनीत पाटील, जिल्हा संघटक सुनील पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, नगरसेवक निलेश शिरसाट यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व शेतकरी सहभागी झाले होते. कार्यालयाबाहेर “शेतकऱ्याचा वाढदिवस झाला रे भाऊ!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.



