खेड – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। कोकणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) संघटनात्मक ताकदीचा आधार मानले जाणारे ज्येष्ठ नेते वैभव खेडेकर यांच्याबाबत मोठी राजकीय चर्चा रंगू लागली आहे. खेड आणि दापोली भागातील प्रभावी चेहरा असलेल्या खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असून, त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेला निवडणुकीआधीच जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे.

वैभव खेडेकर हे खेडचे माजी नगराध्यक्ष असून मनसेच्या स्थापनेपासून पक्षाशी प्रामाणिकपणे जोडलेले आहेत. सध्या त्यांच्यावर राज्य सरचिटणीस व कोकण संघटकपदाची जबाबदारी आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून ते पक्षात नाराज असल्याची कुजबुज कार्यकर्त्यांत सुरू आहे. खेडेकर यांच्या नाराजीची माहिती मिळाल्यानंतर मनसेतील प्रमुख नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधून ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता अधिकच बळावल्याचे चित्र सध्या खेड आणि दापोलीत पहायला मिळत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, खेडेकर हे सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संपर्कात आहेत. गणेशोत्सवानंतर त्यांचा अधिकृत प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खेड आणि आजूबाजूच्या भागात त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा गट असल्याने या निर्णयाचे संभाव्य राजकीय परिणाम स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर नक्कीच उमटू शकतात.
खेडेकर यांचे राजकीय योगदान मोठे असून, त्यांनी खेड नगरपरिषदेत मनसेची पहिली सत्ता आणली. ते मनसेचे पहिले नगराध्यक्ष होते. २०१४ साली त्यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. जरी त्यांना विजय मिळवता आला नसला, तरी त्यांनी पक्षाची उपस्थिती आणि संघटन मजबूत ठेवली होती. शिवसेनेतील नेते रामदास कदम यांच्याशी त्यांचा संघर्षही अनेक वर्षे चर्चेचा विषय राहिला. परंतु त्याच रामदास कदम यांनी खेडेकर यांना शिवसेनेत यायचे आमंत्रण दिले होते.
खेडेकर यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना, “मी नाराज नाही. मी रणांगणात आहे. निष्ठा महत्त्वाची आहे, आणि मी राजसाहेबांची साथ सोडणार नाही,” असे ठामपणे सांगितले होते. मात्र तरीही त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनी देखील ही शक्यता नाकारलेली नाही.
या सर्व घडामोडींमुळे कोकणातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मनसेसाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.



