यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील फैजपूर-हंबर्डी मार्गावर रविवारी सकाळच्या सुमारास चोरवड गावाजवळ एक दुर्दैवी अपघात घडला. या अपघातात प्रमोद लहानू रजाने हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर काही काळ रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याच वेळी योगायोगाने या मार्गावरून प्रवास करीत असलेल्या रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांची नजर या घटनेवर गेली आणि त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून अतिशय तत्परतेने मदतीचा हात पुढे केला.

अपघातग्रस्ताला रस्त्यावर अर्धमहोशीत अवस्थेत पाहताच आमदार जावळे यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःची गाडी थांबवली. त्यांनी स्वतः पुढाकार घेत प्रमोद रजाने यांना आपल्या वाहनात घेतले आणि वेळ न दवडता थेट फैजपूर येथील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहचताच त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधत तातडीने उपचार सुरू होण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करून घेतली.

या वेळी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी दाखवलेली माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अनेकांच्या मनाला भावून गेली. नेहमी जनतेच्या अडचणींमध्ये सहभागी होणारे, संकटसमयी धावून जाणारे आणि जनतेच्या दुःखाशी आपलेपणाने वागणारे आमदार म्हणून त्यांची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या प्रसंगानंतर स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याची आणि तत्परतेची भरभरून प्रशंसा होत आहे.
अचानक घडलेल्या या अपघातात आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे प्रमोद रजाने यांचे प्राण वाचले. ही मदत ही केवळ एक सामाजिक कर्तव्यपूर्ती नव्हे, तर माणुसकीचे खरे दर्शन घडवणारी कृती होती. जनतेच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी होणारा खरा जनसेवक कसा असावा, याचे जिवंत उदाहरण या घटनेतून दिसून आले आहे.



