जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची १४५ वी जयंती आसोदा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी होऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बहिणाबाईंच्या पुतळ्याला हार घालून वंदन केले आणि त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी बहिणाबाईंच्या कार्याचा गौरव केला.

गुलाबराव पाटील म्हणाले, “निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी या शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या भावना आपल्या काव्यातून व्यक्त करणारा आवाज होत्या. त्यांच्या नावाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भव्य पुतळा उभारणीचे काम सुरू आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यात ११ ठिकाणी ‘बहिणाई मार्ट’ सुरू करण्यात आले असून, आसोदा येथे त्यांचे भव्य स्मारक उभारले जात आहे. मला सार्थ अभिमान आहे की, मी बहिणाबाईंच्या गावचा आणि त्यांच्या मतदारसंघातील जनतेचा प्रतिनिधी आहे. त्यांच्या कार्याची स्मृती पिढ्यान्पिढ्या जागी ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.”

या कार्यक्रमादरम्यान, गावातील सार्वजनिक विद्यालय आसोदा शाळेतील विद्यार्थ्यांनी बहिणाबाईंच्या कवितांवर आधारित सुंदर नृत्य आणि सजीव देखावे सादर केले. “अरे संसार संसार” आणि “आज माहेराला जाणं माझी माय सरसोती” यांसारख्या कवितांवरील सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शिक्षिका शुभांगी महाजन, जागृती चौधरी आणि कोल्हे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या कलाकृतींचे पालकमंत्र्यांनी तोंडभरून कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर चौधरी यांनी केले, तर आभार बंडू भोळे यांनी मानले.



