जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने महिलेच्या घरात घुसून तिला आणि तिच्या पतीला अश्लील शिवीगाळ करत, चाकूने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना गुरुवारी 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 वाजता घडली. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात आरोपी रणजीत उर्फ टिनू माणिक सूर्यवंशी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीता गोपाल सोनवणे (वय 30, रा. कांचन नगर, जळगाव) या महिला आपल्या पतीसोबत राहतात. 21 ऑगस्टच्या सायंकाळी 7:30 वाजता याच परिसरात राहणारा संशयित आरोपी रणजीत उर्फ टिनू माणिक सूर्यवंशी त्यांच्या घरात घुसला. त्याने पती-पत्नीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि हातात चाकू घेऊन पतीला जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेमुळे घाबरलेल्या नीता सोनवणे यांनी तात्काळ शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीनुसार, रणजीत उर्फ टिनू माणिक सूर्यवंशी (रा. वाल्मिक नगर, जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश जाधव करत आहेत.



