खामगांव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासकीय तंत्रनिकेतन खामगांव येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी नियामक मंडळाची वार्षिक बैठक २१ ऑगस्ट रोजी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया सभागृहात उत्साहात पार पडली. संस्थेच्या शैक्षणिक, प्रशासनिक आणि भौतिक बाबींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. विविध प्रस्तावांवर चर्चा करत असताना, गुणवत्तापूर्ण शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थी कल्याणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या बैठकीच्या प्रारंभी प्रास्ताविक प्रा. गजानन पदमणे यांनी केले. मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन डॉ. प्रसाद बाहेकर यांनी केले आणि ते मंजूर करण्यात आले. नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. विजय मानकर यांची बदली आर्वी येथे झाल्यामुळे, अमरावती विभागाचे तंत्रशिक्षण सहसंचालक प्रा. मनोज अंधारे यांना नवीन पदसिद्ध अध्यक्ष म्हणून मनोनीत करण्यात आले. इतर सर्व सदस्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

सभेमध्ये संस्थेच्या शैक्षणिक उपक्रम, निकालांचे विश्लेषण, १०० टक्के प्रवेश प्रक्रिया, शिक्षक व अशिक्षकीय रिक्त पदांची पूर्तता, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, विविध क्षेत्रांतील अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपलब्धी, प्रशिक्षण व आस्थापना विभागाचे कार्य, वार्षिक खर्चाचा आढावा, उद्योग संस्थांशी झालेल्या सामंजस्य करार, तसेच उन्हाळी प्रशिक्षण कार्यक्रम यासंबंधी सखोल चर्चा करण्यात आली. याप्रसंगी प्रा. राजेश मंत्री, प्रा. अंकुश दवंड, प्रा. सचिन सोनी, अनिल जवकार, आणि श्रीमती पल्लवी कुळकर्णी यांनी विविध सादरीकरणे केली.
संस्थेतील शिक्षक मनुष्यबळाच्या कमतरतेवर उपाय म्हणून सेवानिवृत्त शिक्षक, उद्योगतज्ञ किंवा खाजगी संस्थांतील शिक्षकांमार्फत बाह्य अध्यापन प्रस्ताव, पर्यावरणपूरक उपक्रम, मराठी भाषा संवर्धनासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणे आणि नवीन टीपीओ धोरण यासारख्या महत्त्वपूर्ण प्रस्तावांना सभागृहात ध्वनिमताने मंजुरी देण्यात आली. याशिवाय शैक्षणिक आणि प्रशासनिक अडचणींवरही चर्चा झाली आणि त्यासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या.
सभेमध्ये संगणक आणि विद्युत अभियांत्रिकी विभाग येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या NBA मान्यतेसाठी सज्ज होत असल्यामुळे त्यावर देखील विशेष चर्चा झाली. तांत्रिक कारणांमुळे सहसंचालक प्रा. मनोज अंधारे यांनी ऑनलाइन माध्यमातून मार्गदर्शन केले, तर डॉ. कांचन मानकर आणि प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
नियामक मंडळाने संस्थेच्या विविध विभागांचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा पाहिल्या आणि त्याबाबत समाधान व्यक्त केले. संस्थेच्या सध्या सुरू असलेल्या फेसलिफ्टिंग कामांची पाहणी करून कामाच्या दर्जाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. एकंदरीत, संस्थेने शैक्षणिक, सामाजिक आणि भौतिक पातळीवर साधलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचे नियामक मंडळाने स्पष्ट केले.
सभेस उपस्थित सदस्यांमध्ये डॉ. कांचन मानकर, डॉ. सोमाणी, प्रा. धिरेंद्र ढोबळे, डॉ. अपर्णा बावस्कर, श्री अनिल जवकार, श्री अजय डवरे यांच्यासह संस्थेतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. सभेचे संचालन प्रा. गजानन पद्मणे यांनी केले आणि प्रा. समीर कुलकर्णी यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.



