पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव मतदारसंघातील राजकीय समीकरणं पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. माजी आमदार तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांची कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी नुकताच १९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यानंतर आज पाचोरा येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या पक्षांतरामागील भूमिका स्पष्ट करत, विविध राजकीय आरोपांना सडेतोड उत्तर दिलं.

“होय, मी पक्ष बदलला, पण गद्दारी केली नाही,” असं ठामपणे सांगत वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेनेतील अंतर्गत गोंधळ, कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष, विकासकामांमध्ये होणाऱ्या अडथळ्यांसह पारदर्शकतेचा अभाव हे भाजपमध्ये प्रवेशामागील प्रमुख कारण असल्याचं सांगितलं. त्यांनी स्पष्ट केलं की, “माझा हेतू सत्तेचा किंवा वैयक्तिक लाभाचा नाही, तर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं आणि विकासाची गती वाढवणं हाच आहे.”

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर काही राजकीय मंडळींनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाचा आरोप केला होता. या आरोपांना साफ फेटाळून लावत सूर्यवंशी म्हणाल्या की, “माझ्या सार्वजनिक जीवनात कधीही अपप्रवृत्तींना स्थान दिलं नाही. माझा कारभार पारदर्शक राहिला आहे आणि भाजप हा याच विचारसरणीशी सुसंगत असल्यामुळे मी हा निर्णय घेतला.”
या पत्रकार परिषदेला माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, सुभाष मुंडे, रमेश वाणी, योजना ताई पाटील, तालुकाप्रमुख गोविंदभाऊ शेलार, सदाशिव आबा, डी. एम. पाटील, बन्सी बापू पाटील, नंदू बापू सोमवंशी, अनिल पाटील, कांतीलाल जैन यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या वक्तव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
वैशाली सूर्यवंशी यांनी कार्यकर्त्यांपासून दूर जाणार नसल्याचा विश्वास व्यक्त करत समाजकारणात अधिक सक्रीय राहण्याचा निर्धार व्यक्त केला. “भाजपचा विचार म्हणजे राष्ट्रहित, विकास आणि पारदर्शकता. या मूल्यांशी एकरूप होऊन मी जनतेची सेवा करत राहणार आहे,” असं त्यांनी सांगितलं. शेवटी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना गणेशोत्सव आणि पोळ्याच्या शुभेच्छा देत त्यांनी सांगितलं, “ही वाटचाल माझी एकटीची नसून कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादांची आहे.”



