जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी आदिवासी पारंपरिक नृत्य, ढोलताशांचा निनाद आणि पारंपरिक संबळ वाद्यांच्या तालावर थिरकणारे शेतकरी… कृषी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या वृषभराजाची निघालेली दिमाखदार मिरवणूक… जळगावच्या जैन हिल्सवरचा पारंपरिक पोळा सण यंदाही डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी २९ वर्षांपूर्वी सुरू केलेली ही परंपरा नव्या पिढीला कृषी संस्कृतीचे महत्त्व कळावे, या उद्देशाने आजही त्याच उत्साहात जपली जात आहे. अशोक जैन यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि अनुभूती स्कूल व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी या आनंदोत्सवात सहभागी होऊन ठेका धरला.

जैन हिल्सवरील ध्यान मंदिराच्या शेजारील कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्राच्या विविध विभागांमधील शेतकऱ्यांनी बैलांना पोळ्यासाठी सजवले आणि तेथूनच सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक श्रद्धेय मोठेभाऊ भवरलालजी जैन यांच्या ‘श्रद्धा ज्योत’ या स्मृतिस्थळाला वंदन करून सरस्वती पॉईंट, गुरुकुल पार्किंग मार्गे जैन हिल्सच्या हेलिपॅड मैदानावर पोहोचली. याच मैदानावर अशोक जैन यांनी धवल ध्वज फडकावून पोळा उत्सवाची सुरुवात केली. यंदा पोळा फोडणाऱ्यांसाठी रोख बक्षिसांची रक्कम वाढवण्यात आल्यामुळे स्पर्धेतील उत्साह द्विगुणीत झाला. जैन वाडा येथील सालदार हंसराज थावरस जाधव आणि अविनाश गोपाळ यांनी प्रत्येकी ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक जिंकत पोळा फोडण्याचा पहिला मान मिळवला. विशेष म्हणजे, हंसराजने सलग चौथ्यांदा हा मान पटकावला. तर जैन सोसायटीचे दिलीप पावरा आणि साजन पावरा यांनी प्रत्येकी २ हजार रुपयांसह द्वितीय क्रमांक पटकावला.

पोळा उत्सवाच्या या सोहळ्यात जैन परिवाराच्या उपस्थितीत वृषभराजाचे पूजन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार, डॉ. शेखर रायसोनी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी, वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या ३१ सालदार आणि त्यांच्या ३२ हून अधिक बैलजोड्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. आदिवासी नवाय गरबा नृत्याने या कार्यक्रमात आणखी रंगत आणली. यावल तालुक्यातील रोशनबर्डी येथील वालू सोनासिंग बारेला यांच्या कलापथकाने पारंपरिक नृत्य सादर केले. विशेष म्हणजे, त्यांनी मानधनाऐवजी प्रत्येकी एक फळझाड घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. जळगावातील विश्वगर्जना युवा सदस्यांच्या १०० वादकांच्या ढोल पथकानेही उपस्थितांची मने जिंकली. गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही या उत्साहात सहभागी होऊन नृत्ये सादर केली. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि अतुल जैन यांनी स्वतः वाद्याच्या तालावर ठेका धरून आनंद व्यक्त केला.
जळगावच्या जैन हिल्सवर साजरा होणारा हा पोळा उत्सव केवळ एक सण नाही, तर कृषी संस्कृतीचा, शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि पर्यावरणाचा आदर करण्याचा एक सोहळा आहे. भवरलालजी जैन यांनी सुरू केलेली ही परंपरा नव्या पिढीला शेती आणि पर्यावरणाशी जोडण्याचे एक उत्तम माध्यम बनली आहे, जिथे शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवता येतो.



