मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील लाखो सरकारी नोकरदार आणि निवृत्त कर्मचारी वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यंदा ऑगस्ट महिन्याचा पगार ५ दिवस आधीच म्हणजे २६ ऑगस्ट रोजीच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सणाच्या तयारीत आर्थिक अडचणी येऊ नयेत आणि उत्सवाचा आनंद द्विगुणीत व्हावा यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असून, सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे.

सरकारने अधिकृत आदेशाद्वारे १ सप्टेंबर रोजी मिळणारे वेतन २६ ऑगस्ट रोजीच अदा करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयाचा लाभ राज्य शासनाच्या विविध खात्यांतील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी व अकृषी विद्यापीठे तसेच त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयातील कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारक व कुटुंब निवृत्त वेतनधारकांनाही मिळणार आहे. परिणामी, सणातील खर्चासाठी कर्मचाऱ्यांचा खिसा आधीच गरम होणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आणखी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. पहिली घोषणा गणेश मंडळांसाठी असून, यावर्षीच्या गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस मंडळांना रात्री १२ वाजेपर्यंत देखावे सादर करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. कराड येथे बोलताना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली असून, लवकरच याबाबतचा अधिकृत आदेश मुख्यमंत्री घोषित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरी महत्त्वाची घोषणा कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार, २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई–बेंगळुरू महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी मिळणार आहे. “गणेशोत्सव २०२५ – कोकण दर्शन” या नावाने विशेष टोलपास देण्यात येणार असून, त्यावर वाहन क्रमांक आणि मालकाची माहिती नमूद केली जाईल. यामध्ये खाजगी वाहने व एसटी बसेस यांचा समावेश राहील.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा हृदयस्पर्शी सण असून, शासनाने घेतलेल्या या निर्णयांमुळे नागरिकांना सण साजरा करताना आर्थिक सुसूत्रता मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आधीच मिळणारा पगार, मंडपांच्या वेळेत वाढ आणि टोल माफीमुळे गणेशभक्तांच्या आनंदात भर पडली आहे.



