Home Cities जळगाव शानभाग विद्यालयात ‘पाऊस गीतांचा’ सुरेल जल्लोष 

शानभाग विद्यालयात ‘पाऊस गीतांचा’ सुरेल जल्लोष 


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पावसाळ्याच्या सरींनी न्हालेली धरती आणि त्यावर उमलणाऱ्या सुरेल स्वरांची उधळण… असा सुरम्य अनुभव कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयात ‘पाऊस गीतांचा कार्यक्रम’ साजरा करताना उपस्थितांना लाभला. विवेकानंद प्रतिष्ठान संचालित या विद्यालयात २१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता रंगलेल्या या सांगीतिक सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या सुरांनी आणि वादनकलेने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले.

एकूण ६३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या कार्यक्रमात “काळी धरती नांगरलेली”, “पड रे पाण्या”, “हसरा नाचरा श्रावण”, “आभाळात धडामधूम”, “बरसो रे मेघा” यांसारख्या पारंपरिक व आधुनिक पावसाळी गीतांच्या सादरीकरणाने वातावरणात नादमय ओलावा पसरवला. विद्यार्थ्यांनी आपल्या गाण्यातून शेतकऱ्यांचे श्रम, निसर्गाची साथ, आनंद आणि आशावाद यांचे सजीव चित्र उभे केले.

कार्यक्रमासाठी संगीत क्षेत्रातील मान्यवरांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रमुख पाहुणे म्हणून मनोज कुलकर्णी (के. नारखेडे विद्यालय, भुसावळ), मकरंद देशमुख (केंद्रीय विद्यालय), प्रा. राजेश पुराणिक (पी. ओ. नहाटा महाविद्यालय) हे मंचावर उपस्थित होते. यांच्यासह विवेकानंद प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा हेमाताई अमळकर, सचिव व शालेय समिती अध्यक्ष विनोदजी पाटील, सहसचिव दिलीपजी महाजन, माजी अध्यक्षा शोभाताई पाटील, महेंद्र शिरोडे, रत्नाकर गोरे, अनिल भोकरे (केशव स्मृती), विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील आणि सर्व विभागप्रमुख यांची उपस्थिती कार्यक्रमास लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीत शिक्षक भूषण गुरव यांनी केले. सूत्रसंचालन सौ. प्रियंका कोळी दीदी व सौ. स्मिता चव्हाण दीदी यांनी त्यांच्या सुरेल आणि रसाळ भाषेत केले.

संगीत शिक्षक भूषण गुरव, वरुण नेवे, दर्शन गुजराती आणि उमेश सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना संगीत प्रशिक्षण व मार्गदर्शन करून त्यांच्यातील कलागुणांना सादरीकरणाच्या रूपात खुलवले.

या कार्यक्रमाला पालक, शिक्षक व संगीतप्रेमी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. पावसाच्या थेंबांप्रमाणे विद्यार्थ्यांच्या स्वरांनी सगळीकडे नवचैतन्य निर्माण केल्याचे प्रेक्षकांनी अनुभवले. शानभाग विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना एक सर्जनशील मंच दिला असून, अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास बळ मिळते, हे पुन्हा सिद्ध झाले आहे.


Protected Content

Play sound