जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील गणेशोत्सव आता केवळ धार्मिक नव्हे, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक मूल्ये जपणारा राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यभरातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा’ असे या स्पर्धेचे नाव असून, ही स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तिन्ही स्तरांवर पार पडणार आहे.

या स्पर्धेसाठी इच्छुक मंडळांनी https://www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावरील ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलवर २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. ही स्पर्धा पूर्णतः विनामूल्य असून, सहभागी होण्यासाठी मंडळांचे अधिकृत नोंदणी व परवाना असणे आवश्यक आहे.

स्पर्धेच्या मूल्यांकनासाठी मंडळांनी केवळ देखावे किंवा सजावट यापुरते मर्यादित राहता कामा नये, तर त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, गड-किल्ल्यांचे संवर्धन, महिलांसाठी उपक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम, देशी खेळांचा प्रचार, विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट यांसारख्या विविध उपक्रमांवर भर दिला पाहिजे. विशेष म्हणजे, प्रदूषणमुक्त वातावरण निर्मिती व सामाजिक जनजागृती हेदेखील परीक्षणाचे महत्त्वाचे निकष ठरणार आहेत.
तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यातून एक सर्वोत्तम मंडळ निवडले जाणार असून, जिल्हा व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. विजेत्या मंडळांना राज्यस्तरीय मान्यता व गौरव प्रदान केला जाईल.
याव्यतिरिक्त, या वर्षी नागरिकांसाठी ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे तसेच प्रसिद्ध गणेश मंदिरांचे लाईव्ह दर्शन घेण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच नागरिकांना आपल्या गणपतीचे छायाचित्र पोर्टलवर विनामूल्य प्रकाशित करण्याची संधीही दिली जात आहे.
अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा व गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक भान जपणारी एक सकारात्मक चळवळ निर्माण व्हावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.
या उपक्रमामुळे गणेशोत्सव केवळ एक धार्मिक सण न राहता सामाजिक, पर्यावरणीय व सांस्कृतिकदृष्ट्या परिणामकारक उत्सव ठरण्याची मोठी संधी मिळणार आहे.



