Home Cities जळगाव नाभिक समाजाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव 

नाभिक समाजाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव 


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाभिक समाज मंडळ, जळगाव शहर यांच्या वतीने पांजपोळ गोशाळा, नेरी नाका येथे बुधवार, दिनांक २० ऑगस्ट रोजी एक भव्य व भावनिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात कीर्तन, विद्यार्थ्यांचा सत्कार, आर्थिक मदत व महाप्रसाद अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून पुण्यतिथी भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता ह.भ.प. सरला वाघ यांच्या कीर्तनाने झाली. कीर्तनामध्ये संत सेना महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. समाज सुधारणा, श्रमप्रतिष्ठा आणि भक्तीचे संदेश देणाऱ्या संतांच्या विचारांचे महत्त्व समाजबांधवांसमोर प्रभावीपणे मांडण्यात आले.

यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच १०वी, १२वी तसेच उच्चशिक्षणात ७५ टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवून यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख स्वरूपात सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे, विविध खेळांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात नाभिक समाज पुढे सरसावतो आहे, याचा प्रत्यय यानिमित्ताने आला.

कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ अशा विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला. या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीची जाणीव अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दर्जी फाउंडेशनचे संचालक गोपालजी दर्जी होते. त्यांच्यासह माजी महापौर सौ. सीमा भोळे, माजी उपमहापौर विष्णू भंगाळे, समाजसेवक पियुष कोल्हे, जिल्हाध्यक्ष  जगन्नाथ वखरे, जिल्हा नेते कांतीलाल वाघ आणि इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत समाजातील एकतेचे आणि प्रेरणेचे संदेश दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जळगाव जिल्हा व शहर कार्यकारिणीचे योगदान मोलाचे ठरले. शेवटी, दुपारी २ ते ३ या वेळेत महाप्रसाद वितरण करण्यात आले. सर्वच समाजबांधवांनी भक्तिभावाने सहभाग घेत संतांच्या विचारांचे स्मरण करत एक आदर्श उपक्रम साजरा केला.


Protected Content

Play sound