जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नाभिक समाजासाठी श्रद्धास्थान असलेल्या संतश्री सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आज, बुधवार २० ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळ संचलित नाभिक हितवर्धक संघ, जळगाव शहर संघटनेतर्फे पुण्यतिथी उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात समाज एकतेचा संदेश देत पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणही करण्यात आले.

सकाळी १० वाजता संत गाडगेबाबा उद्यान येथे कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व आरती करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी संत महाराजांच्या जीवनकार्यावर भाष्य करत समाजप्रबोधन आणि श्रमप्रतिष्ठेच्या मूल्यांची आठवण करून दिली. त्यांच्या विचारांनुसार जीवन जगण्याचे महत्त्व विशद करत उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात श्री गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी यांच्यातर्फे कदंबाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यानंतर श्री प्रभाकर खर्चे, वसंत पाटील व हितेश चिरमाडे यांच्या पुढाकाराने संत गाडगेबाबा उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. समाजाने केवळ परंपरा जपणे नव्हे, तर पर्यावरण रक्षणाच्या दिशेने पाऊल उचलले असल्याचे या उपक्रमातून दिसून आले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष किशोर सूर्यवंशी, जीवा सेना प्रदेशाध्यक्ष देविदास फुलपगारे, जिल्हाध्यक्ष किशोर वाघ, माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, तसेच गोविंद साळुंखे, महारू इसे, बापू सूर्यवंशी, राजकुमार महाले, अनिल निकम, मनीष कुवर, संजय चित्ते आदींसह अनेक मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय महिला मंडळातील बहुसंख्य भगिनींचा सहभाग कार्यक्रमात लक्षणीय होता.
कार्यक्रमाचे सुंदर आणि शिस्तबद्ध सूत्रसंचालन मनीष कुवर यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. आभार प्रदर्शन शहर सचिव अनिलजी निकम यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमात अनुशासन, भक्तिभाव आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.



