पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव-पारोळा मार्गावर वाघरे गावाजवळ आज पहाटे भीषण अपघात घडला असून, सोयगावहून धुळ्याकडे जाणाऱ्या एसटी बस आणि खासगी टेम्पो यांची जोरदार धडक झाली. या अपघातात एक जण ठार झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अपघात आज, बुधवार २० ऑगस्ट रोजी पहाटे साधारणपणे एक वाजण्याच्या सुमारास घडला. महामंडळाची एसटी बस (क्र. MH-14-BT-1984) सोयगावहून धुळ्याकडे जात असताना वाघरे गावाजवळ समोरून येणाऱ्या खासगी टेम्पो (क्र. MH-19-CY-1606) या वाहनाशी जोरदार धडकली. या धडकेनंतर बसमधील आणि टेम्पोमधील अनेक प्रवासी जखमी झाले. घटनास्थळी मदतीसाठी स्थानिक नागरिक तसेच प्रशासन पोहोचले.

अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे चालविण्यात येणारी विनामूल्य रुग्णवाहिका सेवा तत्काळ सक्रिय झाली. रुग्णवाहिकेचे चालक आशुतोष शेलार यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने पारोळा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अन्य खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या भीषण अपघातात पंकज पाटील (३०, उंदीरखेडा) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये मिराबाई पंढरी सोनवणे (५५, सोयगाव), निलाबाई घनश्याम सिरसागर (७५, धुळे), अंजनाबाई रघुनाथ पाटील (७०, हनुमंत खेडा), मनोहर सजन पाटील (६०, चोरवड), रमेश धोंडू चौधरी (८०, भडगाव), मीराबाई रघुनाथ पाटील (८०, धुळे) आणि जानवी संतोष मोरे (१९, धुळे) यांचा समावेश आहे. या जखमींवर पारोळा आणि भोले विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सागर मराठे आणि यश ठाकूर यांनी देखील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.
याशिवाय रघुनाथ गणपंत सोनवणे (ढेकू) हे देखील या अपघातात जखमी झाल्याचे समजते. काही जखमींची ओळख अद्याप पटलेली नसून अधिकृत माहिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.



