जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसी परिसरातील अनेक खाजगी कंपन्यांकडून कामगारांच्या पगारातून कापलेला भविष्य निर्वाह निधी (PF) संबंधित कार्यालयात जमा केला जात नसल्याच्या गंभीर तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आल्या आहेत. यासंदर्भात मनसेने आज, बुधवारी (२० ऑगस्ट रोजी) दुपारी १२ वाजता एमआयडीसीतील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या अधीक्षकांना निवेदन सादर करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
मनसेने निवेदनात म्हटले आहे की, कामगारांच्या कष्टाने मिळवलेल्या पगारातून दरमहा भविष्य निर्वाह निधी म्हणून रक्कम नियमितपणे कपात केली जाते. मात्र, दुर्दैवाने अनेक कंपन्यांकडून ही कपात केलेली रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा केली जात नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून, कामगारांवर उघडउघड अन्याय करणारी आहे. भविष्य निर्वाह निधी हा कामगारांच्या भविष्याची सुरक्षितता, निवृत्तीनंतरचा आधार आणि आपत्कालीन परिस्थितीतील त्यांचा हक्काचा बचाव असतो. या निधीची चोरी किंवा अडवणूक करणे म्हणजे कामगारांच्या जीवनाशी खेळ करण्यासारखे आहे, असे मनसेने निवेदनात नमूद केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या पत्राद्वारे कठोरपणे सूचित केले आहे की, भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रातील अशा सर्व खाजगी कंपन्यांची तात्काळ तपासणी करावी. ज्या कंपन्यांनी कामगारांची कपात केलेली भविष्य निर्वाह निधी रक्कम अद्याप जमा केलेली नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच, संबंधित कंपन्यांना सदर रक्कम तात्काळ भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणीही मनसेने केली आहे.
भविष्यात कोणतीही कंपनी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम थकवणार नाही, याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणीही मनसेने केली आहे. अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगारांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारणार असून, या कार्यालयाच्या निष्क्रियतेविरोधात आवाज उठवेल, असा इशाराही मनसेने दिला आहे. “कामगारांच्या घामाचा प्रत्येक थेंब हा त्यांचा हक्क आहे आणि त्या हक्कासाठी लढणे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बांधिलकी आहे,” असे मनसेने शेवटी म्हटले आहे.



