चोपडा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फोटोग्राफी हा केवळ व्यवसाय न राहता एक अभिव्यक्तीचे, कला आणि माहितीचे प्रभावी माध्यम बनला आहे. गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात झालेले बदल खरोखरच लक्षणीय आहेत, असे मत ख्यातनाम शल्यचिकित्सक डॉ. विकास “काका” हरताळकर यांनी व्यक्त केले. जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त चोपडा तालुक्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

१९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता नारायणवाडी भागातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात डॉ. हरताळकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात जुन्या काळातील फोटोग्राफीची आठवण करून दिली. फार पूर्वी फक्त दोन-तीन फोटोग्राफर शहरात कार्यरत होते. मात्र, आज अनेक युवक या क्षेत्रात कार्यरत आहेत, याचे समाधान असल्याचे ते म्हणाले. त्यांनी कवी कुमार यांच्या कलाकृतीचे उदाहरण देत फोटोग्राफीच्या कलात्मक बाजूला उजाळा दिला. मात्र, आज अपघाताच्या ठिकाणी फोटो काढले जातात पण मदतीसाठी फार कमी लोक पुढे येतात, ही खंतही त्यांनी बोलून दाखवली.

कार्यक्रमाला तहसीलदार भाऊसाहेब थोरात, शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, माजी नगरसेवक जीवन चौधरी, उद्योजक विश्वनाथ अग्रवाल, शेतकी संघाचे सभापती सुनील डोंगरपाटील, वीर पत्नी गं. भा. शामल चौधरी, सूतगिरणीचे माजी संचालक तुकाराम बापू पाटील, प्रल्हाद पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन आणि स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दिवंगत फोटोग्राफर योगेश बैरागी, भागवत पाटील, प्रशांत चौधरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत सुशांक डिजिटलचे संचालक छोटू वारडे, राजेंद्र पाटील, अजहर तेली, जावेद शेख, प्रमोद पाटील, योगेश राजपूत, विनोद जाधव यांनी केले. रमेश जे. पाटील यांनी आपल्या फोटोग्राफी व्यवसायातील अनुभव कथन करत छायाचित्रण कसे समाजाचे दस्तावेजीकरण करते, हे पटवून दिले. तहसीलदार थोरात यांनी फोटोग्राफरशिवाय आज कोणताही विवाह समारंभ पूर्ण होत नाही, हे नमूद करत या व्यवसायाचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमात वीर पत्नी शामल चौधरी यांचा व विद्यार्थिनी पूजा रवींद्र पावरा यांचा गौरव करण्यात आला. डॉ. हरताळकर आणि तहसीलदार थोरात यांच्या हस्ते हा सन्मान झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक संदीप पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बापू महाजन, पप्पू बडगुजर, नाना सोनगिरे, प्रकाश पाटील, उमेश पाटील, विनोद मोरे, हेमकांत देवरे, राजेश पाटील, प्रशांत चांदे, आशिष पाटील, सुरेश चौधरी, शाकीर शेख, ऋषिकेश पाटील, प्रदीप कोळी, मुजमील शेख, भरत राजपूत, जावेद शेख, लीलाधर पाटील आदींनी अथक परिश्रम घेतले.



