मुंबई,-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी आज मुंबई येथीन नरिमन पाईंट येथेआयोजीत कार्यक्रमात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असून या माध्यमातून त्या राजकीय क्षेत्रातील नवीन इनिंग सुरू करत आहेत.

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील मातब्बर राजकीय व्यक्तीमत्व म्हणून ख्यात असणाऱ्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी आज मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात पक्षात प्रवेश घेतला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वैशालीताई सुर्यवंशी यांचे स्वागत केले. याप्रसंगी वैशालीताई यांच्यासोबत त्यांच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. यात प्रामुख्याने माजी नगरसेविका योजना गायकवाड, रंजना पाटील, लक्ष्मी पाटील, सविता शेळके, मनीषा पाटील, सोनाली चौधरी, उषा परदेशी, नीता भंडारकर, शीलाताई पाटील, सुरेखा वाघ यांच्यासोबत एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ महाराज, माजी नगरसेवक मनोहर चौधरी, दिलीप शेंडे, पंचायत समिती सभापती राजेंद्र देवरे, सिकंदर तडवी, रामकृष्ण पाटील, अशोक सोनवणे, राजेंद्र पाटील, राजेंद्र भीमराव पाटील, मच्छिंद्र पाटील, विजयसिंग राठोड, दिलीप पाटील, अर्जुन पाटील, कैलास पाटील, दिनकर हवाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैशालीताई सुर्यवंशी यांचे स्वागत करतांना त्यांच्या मुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघात पक्षाची ताकद आता मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी वैशालीताईंच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील त्यांचे स्वागत केले.
भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्यानंतर वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपण आज भाजपमधून नवीन वाटचाल सुरू करत असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, माझे पिताश्री तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांनी दोनदा युतीचे आमदार म्हणून जनसेवेचा मापदंड प्रस्थापित केला होता. त्यांचा वारसा नेटाने पुढे नेण्यासाठी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. वडिलांचा जनसेवेचा वारसा कायम राखत आपली वाटचाल असेल असे त्यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले.
या प्रवेश सोहळ्याला भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, पाचोरा भडगाव तालुका प्रमुख अमोल शिंदे आदींची उपस्थिती होती.



