पहूर (ता. जामनेर) – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ. हेडगेवार प्राथमिक विद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज राष्ट्रीय महामार्ग पार करताना जीव मुठीत धरावा लागत आहे. रस्त्यावरील वाहतूक आणि सुरक्षिततेच्या अत्यंत अभावामुळे पालकांमध्ये तीव्र संताप आहे. शाळेजवळ झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल यंत्रणा, सूचना फलक आणि गतिरोधक तत्काळ बसवावेत, अशी एकमुखी मागणी पालक शिक्षक संघाच्या सहविचारसभेत करण्यात आली.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ — जळगाव ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर असलेल्या या शाळेतील शेकडो विद्यार्थी दररोज ये-जा करतात. मात्र, महामार्गावरील भरधाव वाहतूक, रस्ता ओलांडताना असलेला धोका आणि शाळेजवळ आवश्यक असलेली कोणतीही वाहतूक नियंत्रण व्यवस्था नसल्यामुळे शाळेच्या दारातच विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शिक्षक वर्ग स्वतः रस्त्यापर्यंत येऊन विद्यार्थ्यांना ओलांडून नेत असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळते.

शाळेजवळ ना झेब्रा क्रॉसिंग, ना सिग्नल, ना सूचना फलक — या उदासीनतेमुळे मुलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाने पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांची संख्या आणि दररोजचा धोका लक्षात घेता, यंत्रणांनी गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे, अन्यथा संभाव्य अपघातांबद्दल जबाबदार कोण? असा सवाल पालक उपस्थित करत आहेत.
या संदर्भात पालक शिक्षक संघाच्या सहविचारसभेत एकमुखी ठराव पार पडला असून, उपाध्यक्ष शंकर भामेरे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त पालकांनी शाळेजवळ झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल यंत्रणा, सूचना फलक आणि गतिरोधक तात्काळ बसवण्याची जोरदार मागणी केली आहे.



