Home Cities यावल यावल-भुसावळ मार्गावरील खड्ड्यांचा हलगर्जीपणा जीवावर बेतू शकतो! नितीन सोनार 

यावल-भुसावळ मार्गावरील खड्ड्यांचा हलगर्जीपणा जीवावर बेतू शकतो! नितीन सोनार 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गावरील भुसावळ पॉईंट ते भुसावळ जुना नाका या सुमारे १ किमी अंतरावरील रस्त्याची दयनीय अवस्था सध्या अपघातांना निमंत्रण देत आहे. रस्त्याच्या मध्यभागी उघड्यावर पडलेले मोठमोठे खड्डे नागरिकांच्या जिवाशी खेळ करणारे ठरत असून, या मार्गाचे तातडीने काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा पूर्व विभागाचे उपसंघटक नितीन सोनार यांनी केली आहे.

सध्या या मार्गावर वाहनचालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे संतुलन बिघडून अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. अनेक नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या असून, काहींनी आपला जीव देखील गमावला आहे. या मार्गावर दुरुस्तीच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ तात्पुरत्या आणि निकृष्ट दर्जाच्या उपाययोजना केल्या जातात. काही दिवसांतच पुन्हा रस्ता खचतो आणि खड्डे तयार होतात, अशी नागरिकांची तक्रार आहे.

या पार्श्वभूमीवर नितीन सोनार यांनी लवकरच केंद्रीय क्रीडा मंत्री ना. रक्षाताई खडसे तसेच रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांची भेट घेऊन, सदर रस्त्याचे दर्जेदार काँक्रीटीकरण व्हावे यासाठी विनंती करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हे एकमेव रस्ता असून यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, त्यामुळे या मार्गाची सुधारणा ही काळाची गरज ठरत आहे.

रस्त्याच्या निकृष्ट स्थितीमुळे शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक आणि दैनंदिन कामासाठी प्रवास करणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यामुळे या प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नितीन सोनार यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound