जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आक्रमक झाली आहे. या घटनेतील समाजकंटकांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज शनिवार, १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
काल, संपूर्ण देश भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करत असताना, दुसरीकडे एका जातीयवादी माथेफिरूने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या हाताच्या बोटाची विटंबना केली. या घटनेमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. या निवेदनात, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, भविष्यात असे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी जिल्ह्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे आणि संरक्षण भिंत बांधावी, अशीही मागणी ‘आरपीआय’ने केली आहे.
यावेळी प्रताप बनसोडे, किरण अडकमोल, राजेश साळुंखे, सचिन अडकमोल, नितीन हातागडे, रोहित गायकवाड, संजय सोनवणे, रोशन महाले, पवन सुरवाडे, सागर खैरनार, मंगला कुमावत, प्रमिला सपकाळे, नरेंद्र मोरे, सागर सपकाळे, नंदाबाई साळुंखे मोरे, उषा चव्हाण, सविता सपकाळे, नंदा बिहाडे, भीमराव साळुंखे, नवाज खान, सुनील पवार, रवी सुरवाडे, जिजाबाई सोनवणे, छाया बिऱ्हाडे, कमल मंगला तायडे, सिंधूबाई अडकमोल, मोरे ललिता शिरसाट यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



