
भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित तिरंगा रॅलीने संपूर्ण शहरात देशप्रेमाचा जागर घडवला. नाहाटा कॉलेज जवळील शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकापासून सुरु झालेली ही रॅली जुना सातारा भागातील भूमिपुत्र शहीद नरेंद्र महाजन यांच्या स्मारकापर्यंत पदयात्रा आणि मोटरसायकल रॅली स्वरूपात पार पडली.

कार्यक्रमाची सुरुवात शहिद राकेश शिंदे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी महिला प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, समाजसेवक प्रमोद सावकारे, मनोज बियाणी, पिंटू कोठारी, राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे यांच्या हस्ते स्मारकाला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व नागरिकांनी मोटरसायकल रॅलीत सहभागी होत देशभक्तीपर घोषणा देत जुना सातारा भागात प्रवेश केला.
रॅलीचा समारोप शहीद नरेंद्र महाजन यांच्या स्मारकाजवळ झाला. येथेही पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शहरातील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभल्यामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. रॅली दरम्यान राष्ट्रध्वज हातात घेतलेले नागरिक, जय हिंदच्या घोषणा आणि देशभक्तीच्या गाण्यांनी वातावरण भारून गेले होते.
या रॅलीत भाजपाचे अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा उपक्रम केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता, शहिदांच्या स्मृती जपण्याचा आणि देशभक्तीची जाणीव नव्या पिढीत रुजवण्याचा एक सुंदर उपक्रम ठरला.



