मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेत गार्ड बोर्ड मंडळामार्फत कंत्राटी सुरक्षा रक्षकांची नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज जोरदार आंदोलन केले. या कथित भरती घोटाळ्यात लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याचा दावा संघटनेने केला असून, या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्या खुर्चीला ‘पैशांचा हार’ घालून निषेध व्यक्त करण्यात आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नियमबाह्य भरतीमुळे जिल्हा परिषदेवर १७ सुरक्षा रक्षकांच्या पगारापोटी दरवर्षी ७० लाख रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. गार्ड बोर्डमार्फत झालेल्या या नियुक्ती घोटाळ्यात जिल्हा परिषद प्रशासनातील सक्षम दस्तावेजांवर सह्या करणारे अधिकारी आणि बनावट दस्तावेजांना पात्र करणारे गार्ड बोर्ड मंडळातील अधिकारी यांचे संगनमत असल्याचा आरोप डॉ. सोनवणे यांनी केला आहे. या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचारातील पैशांमध्ये जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांचाच सिंहाचा वाटा असल्याचा दावाही त्यांनी केला.

डॉ. सोनवणे यांनी याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची भेट घेऊन तक्रार केली असता, त्यांनी “गार्ड बोर्ड मंडळाकडे जा, आमचा काही संबंध नाही” असे उडवाउडवीचे उत्तर दिले. यानंतर डॉ. सोनवणे यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे तक्रार केली असता, त्यांना असे सांगण्यात आले की, कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्या सह्यांचे दस्तावेज प्राप्त झाले आहेत आणि त्यांच्या सांगण्यावरूनच जिल्हा परिषद कार्यालयात मागील तीन महिन्यांपासून कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांची गार्ड बोर्डद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.
यावरून, सदर भरती घोटाळ्याचे मास्टरमाईंड जिल्हा परिषद प्रशासनाचे संबंधित अधिकारीच असून, जिल्हा परिषद प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. यापूर्वी कंत्राटी सुरक्षा रक्षक नियुक्ती करणाऱ्या शिवा सेक्युरिटीच्या कंत्राटदाराने केंद्र शासनासह, महाराष्ट्र शासनाचे जीएसटी, व्यवसाय कर बुडवला होता आणि कंत्राटी सुरक्षा रक्षकांना किमान वेतनानुसार पगारही दिला नव्हता. या सर्वांची तपासणी करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची होती, मात्र पैशांसाठी या अधिकाऱ्यांनी स्वतःचे आर्थिक भले करून घेतल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकाराचा निषेध म्हणून आज सुनील पाटील यांच्या खुर्चीला पैशांचा हार घालून आंदोलन करण्यात आले.



