जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराला सध्या चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे दिसत आहे. महाबळ येथील बाहेती शाळेमागे ठेवलेले बांधकामासाठी लागणारे ९० हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे. याबाबत ठेकेदार किरण जगन्नाथ पवार (वय ३५, रा. समतानगर, जळगाव) यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

किरण पवार यांनी बाहेती शाळेमागे त्यांच्या मालकीचे सेंटिंगच्या लोखंडी प्लेट्स, लोखंडी जॅक आणि इतर बांधकाम साहित्य ठेवले होते. १० जून ते ४ जुलै या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी हे साहित्य चोरून नेले. साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात येताच पवार यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर, रविवारी (१० ऑगस्ट रोजी) सायंकाळी साडेसहा वाजता त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

पवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक विनोद सूर्यवंशी करत आहेत.



