चोपडा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत चोपडा शहरात आज उत्साहाला अक्षरशः उधाण आले होते. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत हजारो आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे यंदा जागतिक आदिवासी दिन आणि रक्षाबंधन एकाच दिवशी आल्याने, परंपरा आणि संस्कृतीचा भावनिक संगम या सोहळ्यात दिसून आला.

हा विशेष दिवस आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार सौ. लताताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले विविध वयोगटातील आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषा आणि वाद्यांसह शहरात दाखल झाले. संपूर्ण चोपडा शहर ढोल-ताशा, आदिवासी नृत्य, पारंपरिक गीतांच्या गजरात न्हालं होतं.

या दिवशी रक्षाबंधनही असल्याने कार्यक्रमात एक वेगळीच भावनिक छटा पाहायला मिळाली. माजी आमदार लताताई सोनवणे यांनी आदिवासी बांधवांना राखी बांधून त्यांच्याशी बंधाचे नाते जपले. त्याचप्रमाणे, आदिवासी भगिनींनी आमदार चंद्रकांत सोनवणे यांना राखी बांधत आपुलकीचा ठेवा जपला. या दृश्याने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि एकतेचं जिवंत उदाहरण घडवून आलं.
यानंतर शहरातून भव्य रॅलीला सुरुवात झाली. डीजेवर आदिवासी गीतांच्या गजरात तरुण-तरुणी, महिला आणि वृद्धांनी पारंपरिक नृत्य करत सहभाग घेतला. रॅलीदरम्यान ‘जय आदिवासी’, ‘संविधान जिंदाबाद’ अशा घोषणा शहरभर दुमदुमल्या. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि चौकांत नागरिकांनी रॅलीचं स्वागत केलं.
या कार्यक्रमात डॉ. अमृता सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, तसेच समितीचे सर्व संचालक मंडळही उपस्थित होतं. त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी चालवलेल्या उपक्रमांची माहिती दिली आणि त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
आजचा उत्सव केवळ आनंदाचा नव्हता, तर समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक अस्मितेचा सन्मान करणारा होता. एकी, बंधुत्व आणि परंपरेचा संगम अशा स्वरूपात चोपडा शहरात आज इतिहास घडवला गेला.



