Home आरोग्य गोदावरी हेल्थसिटीच्या यशामागे कुटुंब, शिस्त आणि सेवा वृत्तीचे बळ – डॉ. उल्हास...

गोदावरी हेल्थसिटीच्या यशामागे कुटुंब, शिस्त आणि सेवा वृत्तीचे बळ – डॉ. उल्हास पाटील


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी फाउंडेशनच्या सदस्य डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात माजी खासदार व गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी डॉ. केतकी यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना, “डॉ. केतकीच्या रूपाने देशाला एक उज्वल भविष्य घडवणारी तरुण पिढी मिळत आहे,” असे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, ज्या वेळी डॉ. केतकीचा जन्म झाला तेव्हा जळगावमध्ये फक्त आठ खाटांचे रुग्णालय होते, परंतु आज तिच्या पायगुणाने तीच संस्था पन्नास खाटांवर पोहोचली आणि आता ‘गोदावरी हेल्थसिटी’च्या रूपाने आरोग्यसेवेत क्रांती घडवणारी संस्था उभी राहिली आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी, डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथी महाविद्यालय, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग आणि डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ. उल्हास पाटील होते, तर डॉ. वर्षा पाटील, डॉ. सुहास बोरले, डॉ. वैभव पाटील, डॉ. एन.एस. आर्विकर, डॉ. प्रशांत सोळंके, प्रमोद भिरूड, डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. आर.के. मिश्रा, विशाखा गणवीर, शिवानंद बिरादर, डॉ. प्रेमचंद पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात बिरुदावली व स्वागताने झाली. डॉ. केतकी पाटील यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्यकुशलतेचा गौरव करताना वक्त्यांनी त्यांच्या वक्तशीरपणा, स्वयंशिस्त, आणि कठोर परिश्रम यांचे विशेषत्वाने कौतुक केले. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

डॉ. केतकी पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. “गोदावरी हेल्थसिटीमध्ये पाय ठेवताना संस्थेच्या नावाशी नाते जोडून प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात मातृभक्ती जागृत होते,” असे सांगून, त्यांनी विद्यार्थी जीवनात केवळ करिअर नव्हे तर कौटुंबिक मूल्येही जपण्याचा सल्ला दिला.

या कार्यक्रमातून केवळ सन्मान नव्हे, तर सेवा, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचे मूल्य अधोरेखित झाले. गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून केवळ वैद्यकीय शिक्षण नव्हे, तर समर्पणशील नेतृत्व घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे या कार्यक्रमातून प्रकर्षाने जाणवले.


Protected Content

Play sound