Home Cities जळगाव  भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात ; विविध कार्यक्रमांनी रंगत

 भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात ; विविध कार्यक्रमांनी रंगत


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । साळी समाजाचे आराध्यदैवत भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव जळगावात मोठ्या भक्तिभावात आणि सांस्कृतिक उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवारी सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू असलेल्या विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे जळगाव शहरातील वातावरण भक्तिमय आणि उत्सवी झाले होते.

या विशेष दिनानिमित्त शहरातील ओक मंगल कार्यालय येथे श्री जिव्हेश्वर युवक मंडळाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी सहा वाजता भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी रामदास डहाके यांनी पोथी वाचन करून वातावरण भक्तिमय केले. त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा समाजातील नवदाम्पत्य सागर व लीना दिवटे यांच्या हस्ते पार पडली. पूजेनंतर परिसरातून भगवान जिव्हेश्वर यांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यात समाज बांधव, महिला आणि तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले. लेझीम, टाळ, फुगडी आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने शहरात उत्सवाचे रंग भरले.

पालखी मिरवणुकीनंतर महिला मंडळ, मुलं आणि तरुणींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये लोकनृत्य, गीते, प्रबोधनपर नाटिका आदींचा समावेश होता. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत आमदार राजु मामा भोळे, उद्योजक यशवंत बारी, महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, संस्थापक अध्यक्ष अरुण डहाके, जिल्हाध्यक्ष अशोक दिवटे आणि युवक मंडळ अध्यक्ष राजु खेडकर आदी मान्यवरांचा समावेश होता. सूत्रसंचालन उपाध्यक्ष सुधीर खंडारे यांनी केले.

कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि समाजकार्य करणाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. ईशांत डहाके, ईशांत साळी, जयमाला लोखंडे, खुशील आकडकर, अथर्व साळी, सिद्धेश डहाके, निखिल साळी, हंसिका डहाके, आयुष निकुंभ, वैष्णवी साळी, ऐश्वर्या वैद्य, साक्षी साळी यांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी सौ. दिपाली खंडारे व सौ. नेहा खंडारे यांनी विशेष खेळांचे आयोजन केले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोक्षदा खंडारे, श्रेया साळी, जिवीका साळी, देवांशी वाझट, भूविका डहाके, हर्षींनी धमके, नेत्रा साळी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव किशोर खंडारे, कोषाध्यक्ष नाना भोगरे, सहसचिव पद्माकर आखडकर, दिनेश साळी, दत्ता भोगरे तसेच महिला मंडळाच्या सुलभा साळी, ज्योती साळी, संगीता भोगरे, जयश्री डहाके, दिपाली खंडारे, नेहा खंडारे, दीपा डहाके, कु. कोमल भोगरे, गायत्री भोगरे, काजल भोगरे यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound