Home राजकीय शिंदे गटात तुफान राडा: श्रेयवादावरून दोन जिल्हाप्रमुख आपापसांत भिडले

शिंदे गटात तुफान राडा: श्रेयवादावरून दोन जिल्हाप्रमुख आपापसांत भिडले


गडचिरोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या गडचिरोली दौऱ्यानंतर शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मंत्री भुसे चंद्रपूरला रवाना होताच, श्रेयवादावरून दोन जिल्हाप्रमुख एकमेकांवर भिडले, ज्यामुळे सर्किट हाऊसमध्ये चांगलाच गोंधळ उडाला.

घडलेल्या प्रकाराबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी गडचिरोली येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीसाठी जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर मंत्री भुसे हे चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले. तेथून निघताच, गडचिरोलीचे जिल्हाप्रमुख संदीप ठाकूर आणि अहेरीचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्यात तुफान बाचाबाची सुरू झाली. हा वाद इतका वाढला की, दोन्ही जिल्हाप्रमुख एकमेकांवर अक्षरशः भिडले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व वाद श्रेयवादातून निर्माण झाला होता. मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर लगेचच घडलेल्या या प्रकारामुळे शिंदे गटातील गटबाजी आणि अंतर्गत धुसफूस पुन्हा समोर आली आहे. या घटनेमुळे काही काळ बैठकीच्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणामुळे शिंदे गटाच्या प्रतिमेला धक्का लागण्याची शक्यता आहे. आता या दोन जिल्हाप्रमुखांविरोधात पक्षश्रेष्ठी काय कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.


Protected Content

Play sound